आदिवासी कुटुंबानी उत्पादीत केलेल्या वस्तुची प्रदर्शनी · विक्री करीता स्टॉलवर विविध उत्पादने उपलब्ध

आदिवासी कुटुंबानी उत्पादीत केलेल्या वस्तुची प्रदर्शनी

· विक्री करीता स्टॉलवर विविध उत्पादने उपलब्ध

 

भंडारा दि. 25: आदिवासी कुटुंबांनी उत्पादीत केलेल्या विविध कला कुसरींच्या वस्तुंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन आज तहसिलदार अरविंद हिंगे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शनासोबतच या वस्तु विक्रीसाठी उपलब्ध असून 31 जानेवारी पर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे.

 

आदिवासी संस्कृती खुप संपन्न आणि समृध्द आहे. पाककृती, हस्तकला, बांबुकला, चित्रकला, वनऔषधी यांनी आदिवसी समाज समृध्द आहे त्याअनुंषगाने ते विविध प्रकारच्या वस्तु/हस्तकला/ खादय पदार्थ उत्पादीत करतात. त्यांच्या कलेचा रोजगार निर्मितीसाठी उत्तम प्रकारे वापर करता येऊ शकतो. याचाच विचार करुन आदिवासी बांधवाना वस्तु विक्रीसाठी बाजारपेठ मिळावी आणि रोजगार निर्मिती व्हावी या हेतुने आदिवासी विकास विभागाने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्याने कार्यालय प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भंडाराच्या आवारामध्ये आदिवासी कुटुंबानी उत्पादीत केलेल्या वस्तुची प्रदर्शनी व विक्री करीता स्टॉल उपलब्ध करुन दिले आहे.

 

आज उदघाटन प्रसंगी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प निरज मोरे, नायब तहसिलदार राजेंद्र निंबार्ते, सहाय्यक प्रकल्प अधिकारी तावडे व प्रकल्प कार्यालयातील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. श्री. हिंगे यांनी स्टॉल वर उपलब्ध असलेल्या वस्तुची माहिती संबधीत कलाकारांकडून जाणुन घेतली. प्रदर्शन व विक्रीच्या स्टॉल ला जिल्हयातील नागरिकांनी भेट देऊन आदिवासी कुटुंबानी उत्पादीत केलेल्या वस्तुचा लाभ घेण्याचे आवाहन आदिवासी विभागाने केले आहे.