जिल्ह्याच्या चौफेर विकासासाठी प्रयत्नशील- जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

जिल्ह्याच्या चौफेर विकासासाठी प्रयत्नशील- जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

 

भंडारा दि. 26: शासनाने विकासाच्या केलेल्या योजनांमध्ये जिल्हावासीयांनी वेळोवेळी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. साहित्य संस्कृती व मूळ जमिनीशी असलेली नाळ भंडारा वासीयांनी कायम ठेवली आहे. या नाळेसह आपल्याला या पुढील वर्षांमध्ये जिल्ह्याचा चौफेर विकास करून घ्यायचा असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज केले.

पोलीस मैदानात आयोजित मुख्य प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला ध्वजारोहण केल्यानंतर राष्ट्रगीत झाले. त्यांनतर पोलीस, गृहरक्षक दल, शालेय विदयार्थी यांच्यासह विविध पथकांनी मानवंदना दिली. यावेळी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, पोलीस अधिक्षक लोहीत मतानी, उपवनसंरक्षक राहुल गवई, निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील उपस्थित होते.

 

प्रगतीच्या नव्या पाऊलवाटावरून चालत राहणे मानवाचा मूलभूत स्वभाव आहे. या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या जिल्ह्याच्या सर्वागिण विकासासाठी सर्व जिल्हावासी व शासन, प्रशासनासह एकत्रितरित्या प्रयत्न करूया अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. स्वातंत्र्य चळवळीतील जिल्ह्याच्या योगदानाचा आढावा घेत अनेक ज्ञात-अज्ञात हुतात्मांनी केलेल्या संघर्षामुळे स्वातंत्र्य मिळाले असून लोकांच्या सहभागानेच समृध्द लोकशाहीची परंपरा देशात कायम असल्याचे ते म्हणाले.

 

याप्रसंगी विविध सांकृतिक कार्यक्रम, प्रात्याक्षिके आणि पारितोषीक वितरणाचा कार्यक्रमही पार पडला. भंडारा पोलीस दलाकडून शाळकरी विद्यार्थ्यांची अतिरेक्यांच्या तावडीतून सुटकेचा चित्त थरारक प्रात्याक्षिकेला उपस्थित नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. तसेच जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थींनींनी देशप्रेमावर गीत, नृत्य आणि नाटकांचे सादरीकरण केले. यात स्वातंत्र्य वीरांचे स्मरणही करण्यात आले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते पारितोषीक वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2021 उत्कृष्ट संकलन करिता जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मतदान नोंदणी प्रक्रिया तसेच मतदार जनजागृती अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबाबत उप विभागीय अधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी वैष्णवी .बी, महात्मा जोतिराव फुले व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनामध्ये उल्लेखनिय कामगिरी केल्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिपचंद सोयाम, माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत क्रमांक 2 मिळाल्याबाबत शिरीनबाई नेत्रवाला स्कुल, तुमसर येथील विद्यार्थिनी गिताई चांदेवार व जिल्हा क्रीडा कार्यालय यांचा तलवारबाजी, नेटबॉल, कनोइंग, कयाकिंग या संघातील खेळाडुंना मिनी ऑलिंपिक पदक प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा गुणगौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्मिता गालफाडे व मुकुंद ठवकर यांनी केले. कार्यक्रमाला सर्व वरिष्ठ अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर व विदयार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.