कृषी विभागाने हाती घेतली वनराई बंधारे बांधण्याची मोहीम Ø प्रत्येक तालुक्यात वनराई बंधारे बांधण्याचा संकल्प

कृषी विभागाने हाती घेतली वनराई बंधारे बांधण्याची मोहीम

Ø प्रत्येक तालुक्यात वनराई बंधारे बांधण्याचा संकल्प

Ø विचोडा येथे लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याचे काम पूर्णत्वास

चंद्रपूर दि. 20 ऑक्टोबर:  पाणी ही मौल्यवान नैसर्गिक साधन संपत्ती आहे. पाणी म्हणजे जीवन असे म्हटले जाते. या पार्श्वभूमीवर पाण्याचा संचय, नियोजन आणि संवर्धन या बाबी फार महत्त्वाच्या झालेल्या आहेत. त्यादृष्ट्रीने कृषी विभागाने नाल्यातून वाहत जाणारे पाणी अडविण्यासाठी वनराई बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेतली  असून प्रत्येक तालुक्यात हे बंधारे बांधण्यात येणार आहेत.
पाणी उपलब्ध असेल तर तिन्ही हंगामात शेतामध्ये विविध प्रकारची पिके घेता येऊ शकतात. वाढती लोकसंख्या व औद्योगिक प्रगतीबरोबरच कृषी उत्पादनासाठी उपलब्ध होणारे पाण्याचे प्रमाण हे दिवसेंदिवस कमी कमी होत आहे. कमी प्रमाणात पाऊस झाल्याने नदी,नाले कोरडे पडत चालले आहे. पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. सिंचनासाठी पाण्याचा वापर काटकसरीने व आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने करणे गरजेचे झाले आहे.  त्यामुळे नदी,नाल्यात शिल्लक असलेले पाणी थांबविणे रब्बी हंगामाच्या पिकांसाठी आवश्यक आहे. हीच बाब विचारात घेऊन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे तसेच मंडळ कृषी अधिकारी भास्कर गायकवाड यांच्या संकल्पनेतून मौजा विचोडा येथील शंकर गौरी यांच्या शेतालगत 10 मीटर लांबीचा वनराई बंधारा लोकसहभागातून बांधण्यात आला. या वनराई  बंधाऱ्यामुळे शेतालगतच्या 12 ते 13 शेतकऱ्यांच्या धान पिकाला शेवटचे पाणी उपलब्ध झाले आहे. त्यासोबतच या वनराई बंधाऱ्यामुळे पाणी अडविल्याने  शेतकऱ्यांना धान पिकाला पाणी देण्यासाठी पंपाद्वारे पाणीपुरवठा करणे शक्य झाले आहे. या पाण्यामुळे पिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळून शेतकऱ्यांच्या उत्पादनात निश्चितच समाधानकारक वाढ  होणार आहे. त्यासोबतच वनराई  बंधाऱ्यामधील पाणीसाठ्यामुळे या भागातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत मिळणार आहे.
या वनराई बंधाराच्या बांधकामाकरिता गावातील कृषी मैत्रीण श्रीमती रामटेके, रोशन रामटेके, कृषी सहाय्यक श्री. हनवते, कृषी पर्यवेक्षक श्री.बुग्गेवार यांनी विशेष योगदान दिले. तर बंधाऱ्याच्या बांधकामाकरिता लागणाऱ्या साहित्याची उपलब्धतेसाठी शेतकरी  शंकर पिंगे, उत्तम पिंगे, महादेव पाटील, श्री. कातकर तसेच गावातील इतर शेतकऱ्यांनी विशेष सहकार्य केले. या नाल्यावर वनराई बंधाऱ्याचे बांधकाम करून पाणी अडविल्याने लगतच्या शेतकऱ्यांना पिकासाठी पाणी उपलब्ध झाले आहे. बंधाऱ्याचे पाणी मिळाल्यामुळे शेतकरी सुखावले असून नाल्याचे पाणी वाया न जाऊ देता ते अडविण्याची शपथ उपस्थित शेतकऱ्यांनी घेतली.  अशाच प्रकारे तालुक्यात अनेक नाल्यावर बंधारे बांधण्याची संकल्पना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी उपस्थित शेतकऱ्यांसमोर मांडली.