कोविड -19 मुळे मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याची प्रक्रिया गतिमान करा – जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी

कोविड -19 मुळे मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याची प्रक्रिया गतिमान करा – जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी

चंद्रपूर, दि. 12: कोविड-19 मुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेले बालक, विधवा महिला व त्यांच्या कुटुंबांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याची प्रक्रिया गतिमान करुन लाभाची प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी दिले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयातील 20 कलमी सभागृहात कोविड-19 रोगाच्या पार्श्वभूमीवर बालकांची काळजी व संरक्षणासाठी आयोजित कृती दलाच्या बैठकीत ते बोलत होते.

 

बैठकीला महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत, बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, नगर प्रशासन अधिकारी अजितकुमार डोके, शिक्षणाधिकारी (माध्य.)कल्पना चव्हाण, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत धोंगडे, बालकल्याण समिती अध्यक्षा अॅड.क्षमा बासरकर-धर्मपुरीवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

 

लाभाची अनेक प्रकरणे तालुकास्तरावर प्रलंबित आहे असे सांगून जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, तालुकास्तरावर असलेल्या प्रलंबित प्रकरणांची तालुकास्तरीय समितीकडून माहिती घ्यावी. वारस प्रमाणपत्राची तालुकानिहाय प्रकरणे प्रलंबित आहे, यासाठी तालुक्यातील अंगणवाडी सेविकांमार्फत वारस प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रे गोळा करावी. कागदपत्रांची पूर्तता तसेच आधार कार्ड, जन्म-मृत्यू दाखला मिळवून देण्यासाठी तालुकास्तरावर कॅम्प आयोजित करावे.

 

जातीचे प्रमाणपत्र देतांना जो लाभार्थी पात्र आहे त्यांची प्रथमतः यादी तयार करावी. विधवा महिलांच्या बाबतीत एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांना सांगून जात प्रमाणपत्र देण्याचे नियोजन करावे. महिलांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास अधिकाऱ्यांसंबेत चर्चा करावी व प्रशिक्षणासंदर्भात कॅम्प आयोजित करण्याचे नियोजन करावे. प्रशिक्षणास इच्छुक असलेल्या प्रशिक्षणार्थी महिलांच्या याद्या प्रशिक्षण केंद्राला उपलब्ध करून द्याव्यात जेणेकरून, महिलांना प्रशिक्षण देणे सोयीचे होईल.

जिल्हाधिकारी श्री. गौडा पुढे म्हणाले, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यासाठी तालुकानिहाय प्रलंबित असलेल्या प्रकरणावर तहसीलदारांना कळवावे. बाल संगोपन योजनेची कोरपणा, जिवती तसेच चंद्रपुरातील प्रलंबित प्रकरणे येत्या दोन आठवड्यात निकाली काढण्याच्या सूचना दिल्या. तसेच कोविड-19 मुळे प्रभावित झालेल्या सर्व कुटुंबांना भेट देऊन योजनांचा लाभ मिळाल्याची खात्री करून तसा अहवाल सादर करण्याच्या सूचना तालुकास्तरीय समितीला दिल्या.

यावेळी लाभार्थींना इतर योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महिला व बालविकास विभाग प्रयत्नशिल आहे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत यांनी बैठकीत सांगितले