लोकसभा निवडणूक : गडचिरोली पोलिस दल सज्ज  15 हजार सुरक्षा जवान तैनात  मदतीला नऊ हेलिकॉप्टर  158 आत्मसमर्पित माओवादी बजावणार मतदानाचा हक्क  615 पोलिस कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान

लोकसभा निवडणूक : गडचिरोली पोलिस दल सज्ज
 15 हजार सुरक्षा जवान तैनात
 मदतीला नऊ हेलिकॉप्टर
 158 आत्मसमर्पित माओवादी बजावणार मतदानाचा हक्क
 615 पोलिस कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान

गडचिरोली दि. 16 : 12-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघाकरीता दिनांक 19 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. गडचिरोली जिल्हा हा माओवादग्रस्त असल्याने मतदान प्रक्रिया सुरक्षीतपणे पार पाडण्यासाठी गडचिरोली पोलिस दल 15 हजारावर सुरक्षा जवानांचा फौजफाट्यासह पूर्ण तयारीनिशी सज्ज झाला आहे.
गडचिरोली पोलिस दलातर्फे बी.एस.एफ., सी.आर.पी.एफ., सी.आय.एस.एफ., एपीएसपी, एस.आर.पी.एफच्या 40 कंपणी तसेच मुंबई रेल्वे पोलिस , नागपूर रेल्वे पोलिस , पिंपरी चिंचवड, पुणे शहर पोलिस , छत्रपती संभाजीनगर रेल्वे पोलिस , नवी मुंबई पोलिस , पुणे रेल्वे पोलिस असा विविध ठिकाणाहून एकुण 1500 च्या वर तसेच छत्रपती संभाजीनगर, जळगाव व इतर ठिकाणाहून 1750 च्या वर गृह रक्षक दलाच्या सुरक्षा जवानांसह एकुण 15 हजाराच्या वर सुरक्षा जवान जिल्ह्यातील संपूर्ण मतदान केंद्रावर तैनात करण्यात आले आहेत.
तैनात सुरक्षा जवानांना निवडणूकीच्या अनुषंगाने प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. यासोबतच जिल्ह्रातील 361 अतिसंवेदनशिल मतदान केंद्रावर केंद्रीय सशस्त्र पोलिस दल तैनात करण्यात आलेले असून सी-60/ क्यु.ए.टी./ वि.कृ.द./ क्यु.आर.टी पथकाच्या 36 तुकड्यांमार्फत जिल्ह्यातील अतिसंवेदनशिल जंगल परिसरात माओवादविरोधी अभियान राबविण्यात येणार आहे. यासोबतच जिल्ह्रातील सर्व मतदान केंद्रावर आकाशमार्गाने सुक्ष्म पाहणी करण्यासाठी अत्याधूनिक 130 ड्रोनसह ड्रोन टीम तसेच माओवाद्यांच्या ड्रोनवर प्रतिहल्ला करण्यासाठी पाच अँटी ड्रोन गन देखिल सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
निवडणूक काळात मतदान केंद्रापर्यंत जाण्या-येण्याच्या मार्गावर डी.एस.एम.डी./व्हेईकल माऊंटेड डी.एस.एम.डी चा उपयोग करुन सुमारे 750 कि.मी. रोड ओपनिंग अभियान राबविण्यात येणार आहे. यासोबतच भारतीय वायुसेनेचे तीन एम.आय.-17 व दोन ए.एल.एच आणि भारतीय लष्कराचे दोन ए.एल.एच असे एकुण सात हेलीकॉप्टर हे गडचिरोली पोलिस दलाच्या मदतीला तैनातीस असून गडचिरोली पोलिस दलाच्या दोन हेलीकॉप्टरसह एकुण नऊ हेलीकॉप्टरच्या सहाय्याने गडचिरोलीतील विविध संवेदनशिल व अतिसंवेदनशिल ठिकाणी मतदान कर्मचाऱ्‍यांना पाठविण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या सिमावर्ती भागातील आंतरराज्य सिमेवरील राज्यांमार्फत देखिल निवडणूकीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर माओवाद विरोधी अभियान राबविण्यात येणार आहे.
भारतीय वायुसेनेच्या आणि भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने 69-अहेरी विधानसभा मतदार संघातील 68 मतदान केंद्रावरील 295 मतदान कर्मचाऱ्‍यांना मतदान केंद्रावर पाठविण्याची प्रक्रिया 16 एप्रिलपासूनच सुरु करण्यात आली असून आवश्यकतेनुसार उर्वरित मतदान अधिकाऱ्यांना हवाई वाहतुकीद्वारे मतदान केंद्रावर सुरक्षितपणे पाठविण्यात येणार आहे.
बंदोबस्तात तैनातीस असलेल्या पोलिसांकरिता मतदान करने शक्य व्हावे म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फतीने गडचिरोली पोलिस दलासाठी दिनांक 13 एप्रिल ते 15 एप्रिल 2024 असे तीन दिवस आरमोरी, अहेरी व गडचिरोली याठिकाणी टपाली मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली होती. यात एकुण 615 पोलिस कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान केले आहे. यासोबतच 158 आत्मसमर्पित माओवादी हे लोकसभा सार्वात्रिक निवडणूक – 2024 करिता मतदान करुन आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या प्रमुख मार्गदर्शनात तसेच अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक अहेरी श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय सशस्त्र पोलिस दल, विविध राज्यातील पोलिस दल तसेच राज्यातील विविध विभागातील पोलिस दल, गृह रक्षक दल सज्ज झाले आहेत. पोलिस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी लोकशाहीच्या या उत्सवात नागरिकांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

Previous articleमतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद
Next articleनिवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी आपसी समन्वयातून काम करा अतिरिक्त विभागीय आयुक्त माधवी खोडे