chandrapur I अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या केळीच्या बागांचे तातडीने पंचनामे करा – विजय वडेट्टीवार

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या केळीच्या बागांचे तातडीने पंचनामे करा – विजय वडेट्टीवार

Ø जळगावातील केळी बागांचे तातडीने पंचनामे करा

Ø आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई, दि. १ : जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे रावेर व मुक्ताईनगर तालुक्यात प्रचंड नुकसान झालं आहे. या दोन्ही तालुक्यातील केळीच्या बागा वादळामुळे अक्षरश: उद्धवस्त झाल्याने केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडला असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असून या तालुक्यांमध्ये झालेल्या नुकसानीचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या मान्सूनपूर्व पावसाने शेतीसह घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं आहे. तालुक्यातील खेर्डी, विटवा, ऐनपूर, निंबोल, सुरवाडी, वाघाडी या परिसरात जोरदार पाऊस झाला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे खेर्डी गावातील अनेक घरांवरील पत्रे उडून गेले. वादळी पावसामुळे केळीच्या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्या असल्याची तक्रारी प्राप्त होत आहेत. अवकाळी पावसाने जळगावातील केळी बागांचे नुकसान झाल्यामुळे जिल्हा प्रशासन आणि राज्यसरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असेही ना. विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या केळीच्या बागांचे लवकर पंचनामे करा असे निर्देश ना. वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून दिले आहेत.