जिल्हा गुंतवणूक परिषदेत 387 कोटीचे सामंजस्य करार

जिल्हा गुंतवणूक परिषदेत 387 कोटीचे सामंजस्य करार

गडचिरोली, दि.07: जिल्ह्यात उद्योग गुंतवणुकीला चालना देण्यासाठी आयोजित जिल्हा गुंतवणूक परिषदेत 46 कंपन्यांनी सहभाग नोंदवत 387 कोटी रुपये गुंतवणूकीसाठी सामंजस्य करार केले. यातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अंदाजे 25 हजार रोजगार उपलब्ध् होणार आहेत.
जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन आज हॉटेल लँडमार्क येथे करण्यात आले होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांचे हस्ते दीपप्रज्वलाने परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा उद्योग व्यवस्थापक बी.के. खरमाटे, यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
श्री धनाजी पाटील यांनी जिल्ह्यात उद्योग व्यवसाय वाढीसाठी जिल्हा प्रशासनाची सकारात्मक भूमिका असल्याचे सांगितले. येत्या काळात येथील लोह उद्योगात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक अपेक्षित असून त्याअनुषंगाने येथे पूरक उद्योगांना मोठ्या संधी आहेत. उद्योगांना चालना देण्यासाठी प्रशासनाद्वारे जिल्ह्यात रेल्वे, महामार्ग व विमानतळ आदी दळणवळणाच्या पायाभूत सुविधा उभारणीच्या कामांना गती देण्यात येत आहे. उद्योगांसाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता पाहता जिल्हा प्रशासनाद्वारे स्थानिकांना विविध कौशल्य विकास प्रशिक्षण दिल्या जात आहे. नक्षली, अविकसित, दुर्गम ही जिल्ह्याची ओळख मिटवून नवीन ओळख निर्माण करण्याची जबाबदारी स्विकारण्याचे आवाहन त्यांनी केले.
उद्योग क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करणे व गुंतवणूकदार आणि व्यवसायिक यांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद आयोजित करण्यात आली आल्याचे जिल्हा उद्योग व्यवस्थापक श्री खरमाटे यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी उद्योग विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.
यावेळी पर्यटन संचालनालयाचे उप संचालक प्रशांत सवाई, आत्माच्या अर्चना कोचरे, गाव माझा उद्योग फाउंडेशनचे संचालक पवन वानखेडे, विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेचे प्राध्यापक अनिरूद्ध लचके, आर.सी.इ.आर.टी.चे डॉ. मनिष उत्तरवार, व्ही.के.जी.बी.चे गजानन माद्यस्वार, शेतकरी उत्पादन कंपनीचे चंद्रशेखर भडांगे यांनी या गुंतवणूक परिषदेच्या दोन सत्रात विविध विषयांवर मार्गदर्शन केले. जिल्ह्यात वनउपज, भातपीक, लोहखनिज व पर्यटन उद्योगात मोठ्या संधी आहेत. जिल्हा प्रशासनाद्वारे नवउद्योजकांकरिता विविध योजना राबविल्या जात आहेत. याचा लाभ घेवून जिल्ह्यातील युवा वर्गाने नौकरी करण्याऐवजी उद्योजक बनण्याची मानसिकता जोपासावी. जोखीमेची मर्यादा निश्चित करून विक्रीची कला अवगत करावी, असा सूर परिषदेत व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिटकॉनचे प्रकल्प अधिकारी देविचंद मेश्राम यांनी केले. परिषदेला जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरीक्षक अभिषेक पाटोळे, पूनम कुसराम तसेच संबंधीत अधिकारी, विविध उद्योजक, नवउद्योजक उपस्थित होते.