जिल्ह्यातील  अतिवृष्टी व पूरग्रस्तांना ४८ तासांच्या आत मदत द्या

जिल्ह्यातील  अतिवृष्टी व पूरग्रस्तांना ४८ तासांच्या आत मदत द्या

पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्हाधिकारी यांना आदेश

चंद्रपूर,दि.२६ : जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना ४८ तासात तातडीने मदत देण्यात यावी, असे आदेश राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्यात यावी असे निर्देश श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. आपदग्रस्तांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असून कोणीही मदतीपासून वंचित राहू नये, अशा पद्धतीने कार्यवाही करण्याचे निर्देशही श्री. मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना अन्न, वस्त्र व निवारा याची कमतरता भासणार नाही. याशिवाय त्यांच्या प्राथमिक आरोग्याकडे दुर्लक्ष होणार नाही, अशा पद्धतीने उपाय करण्याचे आदेशही श्री. मुनगंटीवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

शासकीयस्तरावर मदतीचा ओघ सुरू करण्यात आला असून स्थानिक व जिल्हा प्रशासनाने गंभीरतेने मदत व पुनर्वसनाचे कार्य सुरू करावे. या कार्यात कोणताही कसूर ठेवू नये, असे निर्देशही श्री. मुनगंटीवार यांनी दिले आहेत. अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना करण्यात येणाऱ्या मदतीवर श्री. मुनगंटीवार जातीने लक्ष ठेवून आहेत. आवश्यक त्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाचे वेळोवेळी सकारात्मक सूचना देत आहेत. अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना मदत करणाऱ्या पथकांचे मनोबल वाढवण्याचे कामही श्री. मुनगंटीवार करत आहेत.