मराठा, कुणबी शेतकऱ्यांसाठी सारथीकडून तीन विशेष प्रशिक्षण

मराठा, कुणबी शेतकऱ्यांसाठी सारथीकडून तीन विशेष प्रशिक्षण

Ø योजनेचा लाभ घेण्यासाठी येत्या 31 मार्च पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन 

              भंडारा, दि. 29 : मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी शेतकऱ्यांना छत्रपती शाहु महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्यावतीने (सारथी) ड्रोन पायलट, उच्च तंत्रज्ञानावर आधारित आणि क्षमता बांधणी प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणांचा लाभ घेण्यासाठी शेतक-यांनी 31 मार्च 2024 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन, सारथी नागपुरचे उपव्यवस्थापकीय संचालक सुरेश बगळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

          मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी शेतकऱ्यांना ड्रोनद्वारे पिकांवर किटकनाशकाची फवारणी करण्यासाठी कौशल्यपूर्ण मनुष्यबळ उपलब्ध व्हावे  व यातून रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात या उद्देशाने सारथीद्वारे ‘ड्रोन पायलट प्रशिक्षण कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे.

             तसेच हरितगृहातील व्यवस्थापनासह अन्य 9 प्रकारचे ‘कृषी उच्च तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण’ देण्यात येत आहे. यासोबतच शेतकरी उत्पादक कंपनीतील सभासद व मुख्य कार्यकारी अधिकारी आदींना ‘क्षमता बांधणी प्रशिक्षण’ही (कॅपिसीटी बिल्डिंग ट्रेनिंग) देण्यात येत आहे. या तिन्ही प्रशिक्षण कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले असून या संदर्भातील सविस्तर माहिती सारथीच्या www.sarthi.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.