सिध्देश्वर मंदिरासाठी 14 कोटी 93 लक्ष निधीची प्रशासकीय मान्यता

सिध्देश्वर मंदिरासाठी 14 कोटी 93 लक्ष निधीची प्रशासकीय मान्यता

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे होणार मंदिराचा जीर्णोद्धार

 

चंद्रपुर, दि. 13 : राजुरा तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या देवाडा परिसरातील श्री. सिध्देश्वर मंदिराचे जतन व दुरुस्तीसाठी 14 कोटी 93 लक्ष 99 हजार 753 रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. याबाबत पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने 13 जून 2023 रोजी शासन निर्णय निर्गमीत केला असून राज्याचे सांस्कृतिक मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे या मंदिर परिसराचा जीर्णोद्धार होणार आहे.

 

महाराष्ट्र –तेलंगणा सीमावर्ती भागातील राजुरा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर देवाडा परिसरात 12 व्या ते 13 व्या शतकातील श्री. सिध्देश्वर पुरातन हेमाडपंथी मंदीर असून या परिसरात विविध लहान मोठ्या आकाराची मंदिरे आहेत. सिध्देश्वर मंदीर परिसराचा जीर्णोद्धार करण्यासाठी माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या मागणीनुसार सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 14 सप्टेंबर 2022 रोजी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक आयोजित केली होती. या बैठकीत महाराष्ट्र राज्य पुरातत्व व वस्तुसंग्रहालयाचे संचालक यांना सिद्धेश्वर मंदिराला प्रत्यक्ष भेट देण्याचे,तसेच त्यासंबंधित आराखडा आणि प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूर चे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या होत्या. त्यानुसार आता सिध्देश्वर मंदिरासाठी 14 कोटी 93 लक्ष निधीची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

 

श्रावण महिन्यात व शिवरात्रीला या मंदिरात उत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रातील तसेच नजीकच्या तेलंगणातील हजारो भाविक मोठ्या श्रध्देने दर्शनाला येतात. डोंगराच्या पायथ्याशी व निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या मंदीर परिसराचा कायापालट होणे आवश्यक होते. त्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विशेष लक्ष देऊन निधीसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. त्यानुसार आता या देवाडा परिसरातील पुरातन सिध्देश्वर मंदिराचा जीर्णोद्धार होणार आहे.