हिवाळी अधिवेशनात जुनी पेन्शन योजना लागू करा व अन्य मागण्या..

विमाशि संघाचे हिवाळी अधिवेशनादरम्यान धरणे आंदोलन

जुनी पेन्शन योजना लागू करा व अन्य मागण्यांचा समावेश

गडचिरोली : NPS रद्द करून सर्व राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करा व अन्य मागण्यांना घेऊन महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळ व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने हिवाळी अधिवेशनादरम्यान बुधवार, दिनांक १३ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत यशवंत स्टेडीयम नागपूर येथे धरणे/ निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे.

राज्यातील खाजगी व स्थानिक स्वराज्य संस्थाअतर्गत संचालित प्राथमिक/ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा खाजगी अनुदानित आश्रम शाळेतील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. सरकार याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शिक्षकांत तीव्र नाराजीची भावना लक्षात घेता महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळ व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे यांच्या नेतृत्वात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, अध्यक्ष श्रावण बरडे यांच्या उपस्थितीत धरणे / निदर्शने आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

NPS रद्द करून सर्व कर्मचा-यांना जुनी पेंशन योजना लागू करा, दत्तक शाळा योजना राबविण्याबाबतचा शासन निर्णय रद्द करावा, विद्यार्थी हितासाठी २० पटाखालील शाळा बंद होऊ नयेत, यासाठी समुह शाळा संकल्पना रद्द करणे, विना अनुदानित / अंशतः अनुदानित शाळांना प्रचलित धोरणानुसार १०० % अनुदान मंजूर करण्यात यावे, राज्यातील अघोषित शाळा व नैसर्गिक वाढीव तुकडयांना अनुदानास पात्र घोषित करून आवश्यक निधीची तरतूद करण्यात यावी, राज्यातील रिक्त असलेली माध्यमिक / उच्च माध्यमिक शिक्षकांची पदे तात्काळ भरण्यात यावी, वरिष्ठ श्रेणी मंजूरीचे अधिकार पूर्वीप्रमाणे लेखाधिकारी (शिक्षण) यांना देण्यात यावे, सन २०२२-२३ च्या संच मान्यतेमधील अनियमितता तात्काळ दूर करण्यात यावी, विना अनुदानित / अंशतः अनुदानित शाळेत कार्यरत शिक्षक – विद्यार्थी संख्येअभावी अतिरीक्त झाल्यास त्यांच्या समायोजन संदर्भाने नियमावलीत दुरूस्ती करून त्यांचे समायोजन करण्यात यावे, अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू असलेल्या परंतू DCPS/NPS खाते नसलेल्या कार्यरत / सेवानिवृत्त शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा नगदीने द्यावयाचा पहिला, दुसरा व तिसरा हप्ता तातडीने अदा करण्यात यावा, सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा काही जिल्ह्यामध्ये (उदा. नागपूर / यवतमाळ व भंडारा तसेच इतरही अनेक जिल्हयात) प्रलंबित असलेला पहिला, दुसरा, तिसरा, चौथा हप्ता तातडीने अदा करण्यात यावा, समाजकल्याण व आदिवासी विभागात कार्यरत शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा प्रलंबित पहिला, दुसरा, तिसरा व चौथा हप्ता तात्काळ अदा करण्यात यावा व अन्य मागण्यांचा धरणे आंदोलनात समावेश आहे.

बुधवारी होणाऱ्या धरणे आंदोलनात विदर्भातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या प्रांतीय, जिल्हा, शहर पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.