प्रलंबित व न्यायप्रविष्ठ प्रकरणांचा पाठपुरावा करा-जिल्हाधिकारी विनय गौडा

प्रलंबित व न्यायप्रविष्ठ प्रकरणांचा पाठपुरावा करा-जिल्हाधिकारी विनय गौडा

Ø जिल्हा दक्षता नियत्रंण समितीचा आढावा

चंद्रपूर, दि. 11 : अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत पोलीस तपासावर प्रलंबित असलेल्या गुन्हे व न्यायप्रविष्ठ प्रकरणाचा पाठपुरावा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचा आढावा  घेतांना ते बोलत होते.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, सहायक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख, पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहायक प्रकल्प संचालक प्रणव बक्षी, विधी अधिकारी अनिल तानले आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, अनुसूचित जाती,जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरीता तालुकास्तरावर गठीत समितीच्या नियमित बैठका घ्याव्यात. गुन्हा दाखल व अर्थसहाय्यासाठी प्रलंबित प्रकरणांची माहिती घ्यावी. असेही ते म्हणाले.

जिल्हाधिकाऱ्यांकडून घरकुल योजनांचा आढावा:

घरकुल योजनांचा आढावा घेतांना जिल्हाधिकारी म्हणाले, रमाई आवास, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना, वसंतराव तांडा वस्ती सुधार योजना तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेतील त्रुटींची पूर्तता करावी. संबंधित आवास योजनेची तालुकास्तरावर यादी तयार करून जिल्हास्तरावर पाठवावी. गटविकास अधिकाऱ्यांकडून तांडा वस्तीचे प्रस्ताव मागवून घ्यावे, सदर योजनेचे प्रस्ताव प्रलंबित असल्यास पूर्तता करून जिल्हास्तरावर मंजुरीसाठी पाठवावे. योजनेचा पाच वर्षाचा आराखडा तयार करताना अनुज्ञेय असलेली सर्व प्रकारची कामे प्रस्तावित करूनच आराखडा तयार करण्याच्या सुचना त्यांनी बैठकीत दिल्या.

यावेळी दुरदृष्यप्रणालीद्वारे संबधित तालुक्याचे उपविभागिय अधिकारी, नगरपंचायतचे मुख्याधिकारी तसेच गटविकास अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.