380 विद्यार्थ्यांनी घेतली बालविवाह न करण्याची शपथ

380 विद्यार्थ्यांनी घेतली बालविवाह न करण्याची शपथ
 जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी जनजागृती मोहीम

गडचिरोली दि.24: मुलचेरा तालुक्यातील सुंदरनगर येथील नेताजी सुभाषचंद्र हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी बाल विवाह न करण्याची शपथ घेतली. तसेच बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 अन्वये मुलीचे लग्नाचे योग्य वय 18 वर्ष व मुलाचे 21 वर्ष पूर्ण असून याची आम्हाला जाणीव आहे. वय पूर्ण झाल्याशिवाय आम्ही विवाह करणार नाही, आम्ही आमच्या गावात आणि आमच्या कुटुंबात बालविवाह होऊ देणार नाही तसेच बालविवाहाच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होणार नाही, याविषयी सामुहिकरीत्या 380 विद्यार्थ्यांनी शपथ घेतली.
जिल्हा बाल संरक्षण कक्ष गडचिरोली येथील क्षेत्र कार्यकर्ता रवींद्र बंडावार यांनी नेताजी सुभाषचंद्र हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय सुंदरनगर येथे शिकत असलेल्या 380 विद्यार्थ्यांनी बालविवाह करणार नसल्याची शपथ देवून बालविवाहाचे दुष्परिणाम समजावून सांगितले. बालविवाहामुळे मुलींना मिळणारे हक्क नाकारले जातात. त्यांना लहान वयात घरकाम शिकण्याची सक्ती केली जाते आणि ते शिक्षणापासून वंचित राहतात. आई होण्यासाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी असणं महत्त्वाचं आहे. मुलींच्या लवकर लग्नामुळे त्या लवकर आई होतात. ज्यामुळे आई आणि मुलाचे आरोग्य धोक्यात येते. अल्पवयीन मुलींचा प्रसूतीदरम्यान मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विवाह करणाऱ्या मुलांसाठी 21 वर्षे पूर्ण तर मुलींसाठी 18 वर्षे पूर्ण ही वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींनाही शिक्षा केली जाते. याविषयी मार्गदर्शन क्षेत्र कार्यकर्ता रवींद्र बंडावार यांनी केले.
बालविवाहाबद्दल जागरुकता वाढवण्याच्या आणि प्रथा बंद करण्याच्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून अलीकडच्या काळात त्यात लक्षणीय घट झाली आहे. भविष्यात हे पूर्णपणे नष्ट होईल, असे मत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांनी व्यक्त केले.
सदर उपक्रम जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरूनुले यांच्या मार्गद्शनाखाली घेण्यात आला. यावेळी शाळेचे प्राचार्य वि. के. निकुले, पर्यवेक्षक एस. वानरे, क्षेत्र कार्यकर्ता रवींद्र बंडावार, शिक्षक डी. जी. घाटबांधे, जे.के. दास, डी. एच. हलदार, आर. जे. हलदार, आर. कटाने, उपस्थित होते.