28 व 29 ऑक्टोबर रोजी फुटबॉल खेळाडूंची निवड प्रक्रिया

28 व 29 ऑक्टोबर रोजी फुटबॉल खेळाडूंची निवड प्रक्रिया

Ø जिल्हा क्रीडा संकुलातील फुटबॉल क्रीडांगणावर होणार चाचणी

चंद्रपूर, दि. 23 : जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील प्रतिभावान आणि फुटबॉल खेळाडूचा शोध घेऊन त्यांना फुटबॉल खेळाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच  जिल्ह्याच्या टीमची निवड करून जिल्हा क्रीडा संकुलातील फुटबॉल क्रीडांगणावर तंत्रशुद्ध प्रशिक्षण देणे व टीमला प्रशिक्षित करून दिल्ली येथे आयोजित होणाऱ्या फुटबॉल लीग सामन्यांच्या निवड चाचणीसाठी पाठविण्यात येणार आहे. क्रीडा चाचण्यांचे आयोजन व नियोजनाकरीता सदर संस्थेमार्फत प्रतिभावान फुटबॉल खेळाडूंची निवड प्रक्रिया दि. 28 व 29 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हा क्रीडा संकुलातील फुटबॉल क्रीडांगणावर घेण्यात येणार आहे.

याकरीता दिल्ली येथील, संपूर्ण देशात फुटबॉल खेळाचा प्रचार व प्रसार करण्याकरीता अग्रेसर असलेली इंडिया खेलो फुटबॉल या संस्थेमार्फत जिल्ह्याची मागील वर्षीपासून निवड करण्यात आली आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील 15 तालुक्यातून 15 व 17 वर्ष वयोगटातील मुले फुटबॉल खेळाडूंची निवड करण्यात येणार असून निवड चाचण्यांचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुलातील अद्ययावत फुटबॉल मैदानावर करण्यात येणार आहे. चाचण्यांच्या आयोजनाकरीता जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी पुढाकार घेऊन सदर संस्थेच्या माध्यमातून चाचण्या होण्याकरीता नाविन्यपूर्ण योजनेतून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास 5 लक्ष रुपये निधीची तरतूद उपलब्ध करून दिली आहे.

फुटबॉल खेळाडूंकरीता ही सुवर्णसंधी असल्याने याचा लाभ जिल्ह्यातील सर्व 15 व 17 वर्षातील फुटबॉलपटूंनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.  चाचण्यांचे योग्य नियोजन व खेळाडूंची निवड प्रक्रिया उत्तम व्हावी याकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी प्रयत्न करीत असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.