भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची संधी

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची संधी

Ø 20 ते 29 नोव्हेंबर कालावधीत एस.एस.बी कोर्सचे आयोजन

चंद्रपूर, दि. 23 :भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांकडून सर्विस सिलेक्शन बोर्ड (एस.एस.बी.) या परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यात येते. छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे शासनातर्फे महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी दि. 20 ते 29 नोव्हेंबर 2023 या कालावधीत एस.एस.बी कोर्स क्र. 55 आयोजित करण्यात येत आहे. सदर कोर्ससाठी प्रशिक्षणार्थ्यांची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, चंद्रपूर येथे दि. 9 नोव्हेंबर 2023 रोजी मुलाखतीस हजर राहावे. मुलाखतीस येतांना सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन(पिसीटिसी नाशिक-एसएसबी 55) या कोर्ससाठी संबंधित परिशिष्ट उपलब्ध करून दिले जाईल किंवा 9156073306 या व्हाट्सअप क्रमांकावर एसएसबी-55 हा मेसेज केल्यास कोर्स साठी संबंधित परिशिष्ट व्हाट्सअॅपद्वारे पाठविले जातील. तसेच प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरून सोबत घेऊन यावे.

एसएसबी कोर्समध्ये प्रवेश मिळविण्यासाठी पात्रता व प्रमाणपत्र:-

केंद्रामध्ये एसएसबी कोर्समध्ये प्रवेश मिळविण्यासाठी नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक असून त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येतांना सोबत घेऊन येणे आवश्यक आहे.

कम्बाईन डिफेन्स सर्विसेस एक्झामिनेशन(CDSE-UPSC)अथवा नॅशनल डिफेन्स अकॅडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) पास झालेली असावी. त्यासाठी सर्विसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एन.सी.सी. “सी” प्रमाणपत्र “ऐ” किंवा “बी” ग्रेडमध्ये पास झालेले असावे. एन.सी.सी.ग्रुप हेडक्वार्टर्सने एस.एस.बी.साठी शिफारस केलेली असावी. टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. युनिव्हर्सिटी एन्ट्री स्कीम साठी एस.एस.बी. कॉल लेटर असावे किंवा एस.एस.बी.साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

 अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्या ई-मेल training.pctcnashik@gmail.com व 0253-2451032 या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.