विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत जिल्ह्यातील 825 ग्रामपंयातीमध्ये जनजागृती

विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत जिल्ह्यातील 825 ग्रामपंयातीमध्ये जनजागृती

Ø जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा

चंद्रपूर, दि. 22 : केंद्र सरकारच्या फ्लॅगशीप योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याच्या अनुषंगाने ‘विकसीत भारत संकल्प यात्रा’ 15 नोव्हेंबर ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सदर यात्रेची सुरवात 23 नोव्हेंबरपासून होत असून जिल्ह्यातील 15 तालुक्यातील 825 ग्रामपंचातीमध्ये चित्ररथाच्या माध्यमातून विविध योजनांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आज (दि.22) संबंधित यंत्रणेची आढावा बैठक घेतली.

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) संग्राम शिंदे, मिना साळूंके (पंचायत), महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत, मनपाचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, नगर प्रशासन अधिकारी अजितकुमार ढोके आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, केंद्र शासनाचा हा अतिशय महत्वाकांक्षी उपक्रम आहे. आतापर्यंत लाभ न मिळालेल्या पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचणे, विविध योजनांची जनजागृती, लाभार्थ्यांशी संवाद, त्यांचे अनुभव आणि पात्र लाभार्थ्यांना शोधून त्यांना लाभ देणे, हे या यात्रेचे मुख्य उद्दिष्ट आहे. ग्रामीण आणि शहरी भागात सदर व्हॅन फिरणार असून विविध योजनांशी संबंधित प्रत्येक विभागाच्या प्रतिनिधींचा समावेश समितीमध्ये करावा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) आणि मनपा चंद्रपूर तसेच नगर पालिका प्रशासनाने आपापल्या कार्यक्षेत्रातील संबंधित यंत्रणेशी समन्वय ठेवून योग्य प्रकारे नियोजन करावे, अशा सुचनाही जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी दिल्या.