डेंग्यु विषयी सावधगिरी बाळगा; मनपातर्फे घरोघरी कंटेनर सर्वे

डेंग्यु विषयी सावधगिरी बाळगा; मनपातर्फे घरोघरी कंटेनर सर्वे

चंद्रपूर १० ऑक्टोबर – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डेंग्यु प्रतिरोधक मोहीम पुर्ण क्षमतेने राबविली जात असुन डेंग्युचा धोका टळला नसल्याने आवश्यक ती सावधगिरी बाळगण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.
डेंग्यु प्रतिरोध मोहीम यशस्वी होण्याच्या दृष्टीने मनपातर्फे घरोघरी डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम राबविण्यात येत असुन यात डासांची उगमस्थाने शोधुन नष्ट केली जात आहेत. घरातील कुठल्याही जागी अथवा भांडे सामानात डासांची उत्पत्ती होऊ नये याची काळजी घेतली जात आहे. मोहिमेअंतर्गत ब्रिडींग चेकर्सतर्फे शहरातील ८० हजार घरांची चारदा तपासणी पुर्ण करण्यात आली असुन आशा वर्करद्वारेही दोनदा तपासणी पुर्ण करण्यात आली आहे.          आरोग्य विभागातर्फे शहरातील विविध बांधकामांच्या ठिकाणी आरोग्य शिबीर आयोजित करून जागृती करण्यात आली असुन घरोघरी सर्वेक्षणामध्ये जर डेंग्यु सदृश्य रुग्ण आढळला तर त्या कार्यक्षेत्रात १४ दिवस सातत्याने सर्वेक्षण करण्यात येऊन परिसरात कुणाला डेंग्युची लागण तर झाली नाही याची तपासणी करण्यात येते. लक्षणे आढळल्यास रक्त तपासणी करण्यात येते. स्वच्छता विभागामार्फत आठवड्यातुन एकदा शहरात प्रत्येक जागी धुरळणी व फवारणी करण्यात येत आहे. गप्पी मासे प्रजनन केंद्रांची निर्मिती करण्यात येऊन पाणी साचलेल्या जागी गप्पी मासे सोडण्यात आलेले आहेत.
डेंग्यु प्रतिरोध मोहीम यशस्वी होण्याच्या दृष्टीने १४५ शाळेंमध्ये  स्टुडन्ट ॲक्टिव्हिटी कार्ड दिले गेले असुन याद्वारे मुख्याध्यापक,शिक्षक, शालेय विद्यार्थी व पर्यायाने सर्व घरी कीटकजन्य आजारांविषयी जनजागृती केली जात आहे. सदर मोहीम ८ ऑगस्ट ते ३० ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात येत असुन विद्यार्थी पालकांच्या मदतीने घरी उत्पत्ती होऊ शकणाऱ्या डासांना आळा घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. आठवड्यातुन एक दिवस पालकांच्या मदतीने पाणी साठवलेली भांडी तपासणे, कुलर, फ्रिज, फिश पॉट, पाण्याची टाकी तपासणे, डासअळी आढळल्यास पालकांच्या मदतीने भांडे कोरडे करणे व कापडाने पुसुन घेणे इत्यादी कार्यांद्वारे डासोत्पत्ती स्थाने नष्ट करणे ही सर्व कार्ये  पालकांच्या उपस्थितीतच केली जात आहेत.
डासांमुळे निर्माण होणारे रोग हे धोकादायक ठरू शकत असल्याने आवश्यक ती काळजी घेण्याचे तसेच मनपास सहकार्य करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

डासांची उगमस्थाने –
पावसात मोकळे भूखंड, बंद घराची छते, चालु बांधकामाची ठिकाणे, घरी वापर नसलेली ठिकाणे, कूलर,टायर, फ्रिज, फिश पॉट,भंगारातील वस्तु,डबे,स्वच्छ परंतु अनेक दिवसांपासुन जमा असलेले पाणी इत्यादी ठिकाणे डासांची उगमस्थाने आहेत.

डेंग्युची लक्षणे –
डासांमुळे पसरणाऱ्या आजारांमध्ये डेंग्यूताप व डेंग्यू रक्तस्रावी ताप हे मुख्य आजार आहेत. ताप येणे, अंगावर पुरळ येणे, डोळ्याच्या खोबणीमधे दुखणे, पाठदुखी, डोकेदुखी, स्नायूमध्ये वेदना, सांधेदुखी ही डेंग्यूची प्रमुख लक्षणे आहेत. वस्तुतः डेंग्यू हा सामान्य आजार आहे परंतु या रोगाबाबत माहिती नसल्याने किंवा अपुरी माहिती असल्याने काही वेळा तो जीवघेणा ठरू शकतो. म्हणून प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.

डेंग्यु टाळण्यास उपाययोजना –
डेंग्यु डास हा स्वच्छ व साचलेल्या पाण्यात आढळतो त्यामुळे आपल्या घराची तपासणी करावी . पाणी साठवण्याची भांडी कोरडी करणे,डासअळी आढळल्यास अबेट द्रावण टाकणे, पाणी साठा मोठा असले तर त्यात गप्पी मासे टाकणे आवश्यक आहे. गप्पी मासे पाण्यातील डासांची अंडी संपवितात ज्याने डासांचा प्रादुर्भाव कमी होतो. आठवड्यातून एक दिवस हा कोरडा दिवस पाळावा.