मनपातर्फे २३ महीला क्षय रुग्णांना कोरडा पोषण आहार किटचे वाटप…

मनपातर्फे २३ महीला क्षय रुग्णांना कोरडा पोषण आहार किटचे वाटप

प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियान अंतर्गत

चंद्रपूर १० एप्रिल – प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियानांतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे २३ महीला क्षय रुग्णांना कोरडा पोषण आहार किटचे वाटप करण्यात आले. १० एप्रिल रोजी मनपा सभागृहात आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते सदर किटचे वाटप करण्यात आले असुन यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. प्रकाश साठे व मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार,डॉ. विजया खेरा उपस्थीत होते.
क्षयरुग्णांना उपचार कालावधीत पुरेसा पोषक आहार मिळाल्यास रोग बरे होण्याचे प्रमाण वाढते व रोगामुळे होणारी अनुषंगिक गुंतागुंत टाळता येते उपचाराखाली असलेल्या व सामाजिक साहाय्य मिळावे यासाठी संमती दिलेल्या क्षयरुग्णांना उपचार कालावधीत पुरेसा पोषक व इतर सहाय्य मिळावे यासाठी मा. राष्ट्रपती महोदयांनी ९ सप्टेंबर २०२२ रोजी प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियानास सुरवात केली आहे.
सकस पोषक आहारही व्यक्तीला रोगापासुन दुर ठेवण्यास मदत करतो,उच्च प्रथिने असलेल्या या पोषण आहार किटमध्ये तांदुळ अथवा गहु,तूर डाळ,शेंगदाणे, तेल,सोयाबीन वडी,चणाडाळ, मुगडाळ,मोट,मसुर,बरबटी, राजमा,गुळ,चिक्की,खजूर इत्यादींचा समावेश असून मनपा हद्दीत ॲक्टिव्ह रुग्ण असलेल्या २३ महिला क्षय रुग्णांना सदर किट देण्यात आली आहे.
बना नि-क्षय मित्र –
क्षयरोगाच्या निर्मूलन अभियानात प्रत्येक रुग्ण दत्तक घेण्यासाठी  ‘नि-क्षय मित्र’ अशी योजना राबविण्यात येत आहे. यात शहरातील दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्था यांना ६ महिने ते ३ वर्षेकरीता रुग्ण दत्तक घेता येणार आहे. रुग्णाला दत्तक घेणाऱ्या व्यक्तीला ’ नि-क्षय मित्र’  संबोधिले जाते.दत्तक रुग्णाला  ‘नि-क्षय मित्र’ कडून ६ महिने ते ३ वर्षे पोषण आहार पुरविला जातो. या पोषण आहारात तेल, बाजरी, ज्वारी, शेंगदाणे, कोणतीही एक डाळ यांचा समावेश होतो. औद्योगिक संस्था, स्टील उद्योग,सिमेंट फॅक्टरी, स्वयंसेवी संस्था, अशासकीय संस्था व दानशुर व्यक्ती यांनी प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त भारत अभियानात ‘निक्षय मित्र’ म्हणून सहभागी होऊन क्षयरुग्णांना पोषण आहार द्यावा.
निक्षय मित्र होण्यासाठी, सर्वप्रथम communitysupport.nikshay.in वर लॉग इन करावे लागेल. यानंतर, पंतप्रधानांच्या टीबीमुक्त भारत मोहिमेवर क्लिक केल्यानंतर, निक्षय मित्र नोंदणी फॉर्मवर नोंदणी करून या मोहिमेत सामील होऊ शकता. नोंदणीनंतर टीबी रुग्णांना त्यांच्या सोयीनुसार निक्षय सहाय्यासाठी निवडता येईल. क्षयरोगमुक्त भारत मोहिमेतील क्षयरोगाशी संबंधित सर्व प्रकारच्या माहितीसाठी पंतप्रधान निक्षय हेल्पलाइन क्रमांक 1800 -11- 6666 वर संपर्क साधू शकतात अथवा  ‘नि-क्षय मित्र’ बनण्यास जिल्हा रुग्णालय, मनपा आरोग्य विभाग अथवा ९२८४७८६०९४ या क्रमांकावर संपर्क संपर्क साधू शकतात

आयुक्त विपीन पालीवाल – हे अभियान यशस्वी करण्यासाठी लोकांचा सहभाग वाढला पाहिजे. क्षयरुग्णांना योग्य आहार, उपचार वेळेवर मिळाल्यास क्षयरोग पूर्णपणे बरा होतो. समाजातील जास्तीत जास्त लोकांनी, स्वयंसेवी संस्थांनी या अभियानात सहभागी होऊन क्षयरोगमुक्त चंद्रपूर शहर व देश करण्यासाठी हातभार लावावा.

क्षयरोगाची लक्षणे –
दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीचा खोकला, वजन कमी होणे, भूक मंदावणे, हलकासा ताप येणे, छातीत दुखणे ही क्षयरोगाची प्रमुख लक्षणे आहेत. रुग्णाचे मनोबल वाढवण्यासाठी रुग्ण राहत असलेल्या खोलीतील हवा खेळती ठेवावी. सकस आहार, फळे आहारात द्यावी. जेवण आणि औषधी वेळेवर घ्यावीत. मास्कचा वापर करावा.

खासगी वैद्यकीय व्यावसायिकांचा सहभाग महत्त्वाचा –
खाजगी दवाखान्यात निदान आणि उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्या अधिक आहे. याकरिता सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिक, प्रयोगशाळा, रेडिओलॉजिस्ट यांनी स्वतःहून पुढे येऊन निदान झालेल्या व उपचार घेत असलेल्या सर्व क्षयरुग्णांची माहिती शासनास कळवणे बंधनकारक आहे. जेणेकरून सर्व क्षयरुग्णांना योग्य उपचार व उपचार संपेपर्यंत पाठपुरावा क्षयरोग विभागामार्फत करणे शक्य होईल.