‘आय.एन.डी.आय.ए’ आघाडी ‘नमो’ लाटे समोर टिकणार नाही-हेमंत पाटील

आय.एन.डी.आय.‘ आघाडी ‘नमो‘ लाटे समोर टिकणार नाहीहेमंत पाटील
संसदेच्या विशेष अधिवेशनातून मोदी षटकार मारणार

मुंबई, १ सप्टेंबर २०२३

विरोधकांनी एका व्यासपीठावर येवून केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करण्यासाठी स्थापन केलेल्या आय.एन.डी.आय.ए आघाडी येत्या काळात होवू घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ‘नमो’ लाटेसमोर टिकणार नाही, असा दावा इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शुक्रवारी केला. मुंबई सुरू असलेल्या विरोधकांच्या आघाडीवर यानिमित्ताने पाटील यांनी टिकास्त्र डागले. जोपर्यंत नरेंद्र मोदी यांच्या विरोधात त्यांच्याच उंची एवढा आणि देशहिताला प्राधान्य देणारा चेहरा दिला जाणार नाही, तोपर्यंत केंद्रात मोदीच सत्तेत राहतील,असे भाकित देखील पाटील यांनी वर्तवले.

जी-२० च्या शिखर संमेलनानंतर बोलावण्यात आलेल्या संसदेच्या पाच दिवसीय विशेष अधिवेशनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी षटकार मारतील.अनेक महत्वाचे विधेयक, घोषणा, निर्णय या अधिवेशनादरम्यान होण्याची शक्यता आहे, असे पाटील म्हणाले.केंद्रातील भाजप सरकार खाली खेचण्यासाठी संधीसाधू विरोधकांनी आपल ‘वज्रमुठ’ बांधली असली तरी, याचा काही एक फायदा होतांना दिसत नाही.उलटपक्षी आय.एन.डी.आय.ए आघाडीतच सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र दिसून येत आहे.आतापासूनच आघाडीत पंतप्रधान पदासाठी अंतर्गत रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे. आम आदमी पक्षाच्या नेत्याने तर अरविंद केजरीवाल यांना पंतप्रधान पदासाठी योग्य उमेदवारही घोषित केले आहे. आप आणि कॉंग्रेसमधील मतभेद अद्यापही दूर झालेले नाहीत. याचा फटका आघाडीला बसेल, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

विरोधकांच्या आघाडीत एक महत्वाचा चेहरा असलेले शरद पवार त्यांच्या पक्षफुटीमुळे बॅकफूटवर आले आहेत.आपला पक्ष, नेते आणि निवडणूक चिन्ह वाचवण्यासाठी त्यांची उतारवयात धावपळ सुरू आहे. पवारांच्या कुटनितीचा आणि चाणक्य बुद्धीमत्तेचा अशा वातावरणात आघाडीला म्हणावा तेवढा फायदा होतांना दिसून येत नाही. राहुल गांधी यांच्याकडे आघाडीने नेतृत्व द्यावे इतपत ते अद्यापही सक्षम झालेले नसल्याचे दिसून येते. अशात आघाडीकडे पंतप्रधान पदासाठी मोदींच्या तोडीचा एकही चेहरा नसल्याने जनता ‘नमो’ यांनाच पंसती देतील, अशी भावना यानिमित्ताने पाटील यांनी व्यक्त केली.