शिबिरातून मिळाली मुलींना कायदेविषयक माहिती

शिबिरातून मिळाली मुलींना कायदेविषयक माहिती

Ø विधी सेवा प्राधिकरण तर्फे लोकमान्य टिळक कन्या विद्यालय येथे आयोजन

 

चंद्रपूर, दि.15 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर मार्फत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृद्धी एस भीष्म यांच्या मार्गदर्शनात दि. 15 जुलै रोजी लोकमान्य टिळक कन्या विद्यालय, चंद्रपूर येथे कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपस्थित मुलींना कायदेविषयक माहिती देण्यात आली.

 

यावेळी, ज्येष्ठ अधिवक्ता रवींद्र भागवत, अतिरिक्त प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी नेहा गोरले, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुमित जोशी, अधिवक्ता योगेश्वर पाचारे, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आरजू पठाण,अतिरिक्त प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती कपिल,लोकमान्य टिळक कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मंजीरी डबले आदींची उपस्थिती होती.

 

अध्यक्षीय भाषणात बोलतांना ज्येष्ठ अधिवक्ता रवींद्र भागवत म्हणाले, कायदे हे सर्वांसाठी असतात त्यामुळे कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे. विद्यार्थी दशेमध्ये सातत्यपूर्ण अभ्यासाची आवश्यकता असून कोणत्याही मोहाला बळी न पडता यशस्वी होण्याचा सल्ला दिला.

 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुमित जोशी यांनी न्यायव्यवस्था व त्यानुसार विधी सेवा प्राधिकरण व प्राधिकरणामार्फत दिल्या जाणाऱ्या सर्व सेवा आणि योजना याबाबत मार्गदर्शन करून वेगवेगळ्या उदाहरणातून कायदा व त्यातील तरतुदी समजावून सांगितल्या.

 

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आरजू पठाण चंद्रपूर यांनी बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण )अधिनियम 2000 तर अधिवक्ता योगेश्वर पाचारे यांनी लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 विषयी उपस्थित विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. त्यासोबतच अतिरिक्त प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी नेहा गोरले यांनी बेटी बचाव बेटी पढाव तसेच बालकांचे अधिकार या विषयांवर मार्गदर्शन केले. प्रस्तावना पुण्य प्रेड्डीवार यांनी तर कार्यक्रमाचे संचालन व आभार दुर्गा पुरोहित यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप श्रीमती स्वरूपा जोशी मॅडम यांच्या पसायदानाने करण्यात आली.