कलापथकांव्दारे शासकीय योजनांचा जागर हा स्तुत्य उपक्रम – आमदार राजू कारेमोरे

कलापथकांव्दारे शासकीय योजनांचा जागर हा स्तुत्य उपक्रम – आमदार राजू कारेमोरे

भंडारा, दि. 14 : कलापथक हे ग्रामीण जनतेशी एकरुप होते. स्थानिक भाषेतील संवादामुळे शासकीय योजनांची माहिती उत्तम पध्दतीने नागरिकांपर्यंत जात आहे.  माहिती व जनसंपर्क विभागाच्या जिल्हा माहिती कार्यालयामार्फत कलापथकांव्दारे शासकीय योजनांचा जागर हा स्तुत्य उपक्रम असल्याचे मत तुमसरचे आमदार राजू कारेमोरे यांनी व्यक्त केले.

विद्यमान सरकारला 2 वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने शासनाने घेतलेले लोककल्याणकारी निर्णय तसेच विकास कामांची माहिती लोककलांच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यात दिली जात आहे. 17 मार्च पर्यंत या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची हा संदेश व सोबत योजनांची माहिती लोककला व पथनाट्याच्या माध्यमातून दिली जात आहे. असर फाउंडेशन कलपथकांच्या कलाकारांनी आमदार राजू कारेमोरे यांची भेट घेऊन त्यांना या उपक्रमाची माहिती दिली. त्यावेळी ते बोलत होते.

जिल्ह्यातील सातही तालुक्यात बाजारपेठेच्या व इतर गावी शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेला देण्यासाठी लोककला आणि पथनाट्यांचा वापर प्रभावी ठरत असल्यामुळे शासनाच्या शिवभोजन थाळी, ग्रामविकास, कृषी, स्वच्छ भारत अभियान, महाआवास, आदिवासी खावटी अनुदान योजना यासह विविध योजनांची कलापथकाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. असे कलपथकांच्या सदस्यांनी त्यांना सांगितले.

महिला व बालविकास विभागामार्फत अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या. त्याप्रमाणे कृषी, पणन, फलोत्पादन, मत्स्यव्यवसाय, सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास, आदिवासी विकास, रोजगार हमी, आरोग्य या सारख्या अनेक विभागांनी या दोन वर्षाच्या काळात जनकल्याणासाठी योजना तयार केल्या व त्याची प्रभावी अंमलबजावणी केली. या योजनांची माहिती नागरिकांना व लाभार्थ्यांना व्हावी आणि त्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा यासाठी कलपथकांच्या माध्यमातून ही माहिती पोहोचविली जात आहे. ही मोहीम 9 ते 17 मार्च दरम्यान राबविण्यात येत आहे. आपल्या गावात कलापथक मंडळ आल्यास या जनजागृती कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.