विशेष वृत्त ; जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत 12 हजार 268 लाभार्थ्यांना थेट लाभ

विशेष वृत्त ; जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत 12 हजार 268 लाभार्थ्यांना थेट लाभ

 

भंडारा, दि. 15 : सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत यासाठी राज्यात ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ 13 मे रोजी सातारा जिल्ह्यातील दौलतनगर येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला.

 

शासन आपल्या दारी अभियानात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत 12 हजार 268 लाभार्थ्यांना आभा आय.डी.कार्ड, आयुष्यमान भारत योजनेचा थेट लाभ देण्यात आला आहे. तर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे 10 हजार 137 लाभार्थ्यांना इयत्ता 8 वी ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील मुलींना सावीत्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, मॅट्रीकपुर्व दिव्यांग शिष्यवृत्ती, युडीआयडी कार्ड, कोरोना पार्श्वभुमीवर कलाकारांना अर्थसहाय्य देणे व इयत्ता 1 ते 10 वी मध्ये शिकणात्या विद्यार्थ्यांना मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यात आला. जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे 22 लाभार्थ्यांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात आली. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत फिरता निधी, समुदाय गुंतवणून निधी, शबरी आवास योजना ग्रामीण व रमाई आवास योजनेमध्ये 341 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले.

 

राज्यात ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचे जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर प्रमुख आहेत. त्यांच्या माध्यमातून या अभियानाचा आढावा घेण्यात येतो. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक जिल्ह्यातून किमान 75 हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ दिला जाणार आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश शासनाच्या योजनांचा, उपक्रमांचा लाभ सर्वसामान्यांना त्वरित मिळावा हा आहे. शासन आपल्या दारी अभियान महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

 

दिनांक 4 मे च्या शुध्दीपत्रकानुसार जत्रा शासकीय योजनांची या उपक्रमाचे नाव शासन आपल्या दारी करण्यात आले आहे. जिल्ह्यात प्रत्येक शासकीय विभागामार्फत लाभार्थ्यांना त्यांचे लाभ शिबीराद्वारे मिळत असल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांची सुलभता झाली आहे. दिनांक 15 एप्रिल ते 15 जून पर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे.