राज्यातील महानिर्मितीच्या पहिल्या पाईप कन्व्हेयर प्रकल्पाचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे शुभहस्ते लोकार्पण

राज्यातील महानिर्मितीच्या पहिल्या पाईप कन्व्हेयर प्रकल्पाचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे शुभहस्ते लोकार्पण

             चंद्रपूर,दि. 13 नोव्हेंबर- चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला भटाळी खुल्या कोळसा खाणीतून थेट कोळसा पुरविण्यासाठी आधुनिक पाईप कन्व्हेयर प्रणालीचे लोकार्पण आज ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलतांना डॉ. नितीन राऊत म्हणाले की, या प्रणालीमुळे प्रदूषण कमी होणार आहे. वीज निर्मितीचा खर्च कमी करण्यासाठी या प्रणालीचा उपयोग होणार आहे. तर कोळसा औष्णिक वीज केंद्रात पोहोचविणे हे काम अतिशय क्लिष्ट असल्याने  यावर तोडगा काढण्यासाठी ही नवी प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

            पाईप कन्व्हेयर प्रकल्प बाधित गावातील बेरोजगारांना रोजगार देण्यासंबंधी त्यांनी निर्देश दिले तर वीज प्रकल्पग्रस्तांना रोजगार देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून ते म्हणाले, काही लोकांची नावे प्रतिक्षा यादीत आहेत. यापैकी 190 जणांना सामावून घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. वाघाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सुरक्षा भिंत कामाला मंजुरी देण्यात आली असून इरई नदीचे प्रदूषण थांबविण्याकरिता राख बंधारा उंची वाढविण्याच्या कामाला देखील मंजुरी देण्यात आल्याचे डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.

            राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे शुभहस्ते पाईप कन्व्हेयर प्रणाली फलकाचे अनावरण तसेच बटन दाबून लोकार्पण करण्यात आले. सुरवातीला या कन्व्हेयर प्रकल्पाविषयीची माहिती देणारी व उपयुक्तता सांगणारी चित्रफीत दाखविण्यात आली. कन्व्हेयर प्रणालीद्वारे कोळसा वाहतूक नेमकी कशी होते आणि त्याची देखभाल दुरुस्तीसाठी तयार करण्यात आलेल्या ट्रोलीद्वारे मंत्री महोदयांनी पाहणी केली.

            कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत,  चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, राज्यमंत्री (ऊर्जा)  प्राजक्त तनपुरे, चंद्रपूर जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले, आमदार प्रतिभा धानोरकर, किशोर  जोरगेवार, प्रधान सचिव(ऊर्जा) दिनेश वाघमारे, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक महानिर्मिती संजय खंदारे, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रवीण कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, महानिर्मीतीचे संचालक(प्रकल्प) वी. थंगपांडियन प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.

            पालकमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, जिल्ह्यात सिमेंट उद्योग, कोळसा उद्योग व खाणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे  प्रदूषण वाढले आहे. राज्यातील सर्वात मोठा वीज उत्पादक जिल्हा असतांना नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे सुद्धा गरजेचे आहे. महानिर्मितीच्या या पर्यावरणपूरक प्रकल्पामध्ये  स्थानिकांना रोजगार मिळावा अशी मागणी त्यांनी केली. जिल्ह्यामध्ये विद्युत वितरण व्यवस्था बळकट करावी. ऊर्जानगर वसाहत परिसरात वाघ येऊ नये म्हणून वॉल कंपाऊंड बांधण्याची सूचना तसेच इरई नदी प्रदूषण कमी करण्यासाठी राख बंधाऱ्याची उंची वाढविण्याची त्यांनी मागणी केली.

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले की, शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी सौर उर्जा वाहिनींचा वापर करण्यावर भर देण्यात येईल. यामुळे शेतकऱ्यांना स्वस्त वीज उपलब्ध होईल. वीज ग्राहकांना स्वस्तात वीज दिली पाहिजे, सुदृढ स्पर्धा झाली पाहिजे, व्यावसायिकता आली पाहिजे यावर बारकाईने अभ्यास करून आर्थिक बचत आणि अधिक पारदर्शकता आगामी काळात आणावी लागणार आहे. कोविड काळात महानिर्मितीच्या अभियंता व कामगारांनी ऑक्सिजन प्लांट उभारून सामाजिक बांधिलकी जोपासली असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

            प्रधान सचिव (ऊर्जा) दिनेश वाघमारे म्हणाले की, पाईप कन्व्हेयरच्या दृष्टीने मोठी पायाभूत गुंतवणूक आणि सुविधा उभारण्यात आली आहे. कोविड काळात वीज कंपन्यांनी उत्तम काम करून राज्याला प्रकाशमान ठेवले ही अभिनंदनीय बाब आहे. प्रास्ताविकातून संजय खंदारे यांनी सांगितले की, ऊर्जा क्षेत्रात नवनवीन आव्हाने आहेत, त्याकरिता आधुनिक तंत्रज्ञान आणि कुशल मनुष्यबळाच्या माध्यमातून सौर, औष्णिक, जल विद्युतचे संतुलन साधावे लागणार आहे आणि सोबतच वीज नियामक आयोगाच्या निकषांची प्रभावी अमलबजावणी करून वीज ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी बांधील आहोत.

 समारंभाचे सूत्र संचालन रेणुका देशकर यांनी तर उपस्थितांचे आभार वी. थंगपांडियन यांनी मानले.

या प्रसंगी महानिर्मितीचे कार्यकारी संचालक(प्रकल्प) संजय मारुडकर, प्रभारी कार्यकारी संचालक प्रकाश खंडारे, मुख्य अभियंते अनिल आष्टीकर, पंकज सपाटे, राजेश कराडे, राजेश पाटील तसेच राष्ट्रीय समन्वयक अनिल नगरारे, महानिर्मिती-वेकोलिचे वरिष्ठ अधिकारी अभियंते आणि स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 कन्व्हेयर पाईपची वैशिष्ट्ये :

एकूण लांबी – ६.०६ किलोमीटर, कोळसा वहन क्षमता ५०० मेट्रिक टन प्रती तास,प्रतिदिन ६००० मेट्रिक टन

पाईप कन्व्हेयरचे फायदे :

प्रदूषण कमी होणार, कोळसा रस्ता वाहतूक खर्च कमी होणार, प्रदूषणात घट, पर्यावरण संतुलन राखण्यास हातभार,

कोळसा चोरीस आळा कोळसा जड वाहतुकीमुळे अपघातास प्रतिबंध.