स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त

कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न

                भंडारा,दि.13: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशानुसार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व नगर परिषद कार्यालय भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने 9 ऑक्टोबर 2021 रोजी शहर उपजीविका केंद्र, मिस्कीन टँक गार्डन, राजीव गांधी चौक भंडारा येथे दिव्यांगाकरिता कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
            दिव्यांगाचे हक्क हिरावून घेण्याचा जर कुणी प्रयत्न करत असेल तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच तालुका विधी सेवा समितीशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुहास भोसले यांनी केले. विधी सेवा प्राधिकरणामार्फत सर्व दिव्यांगांना न्यायालयात प्रकरण दाखल करण्याकरिता किंवा न्यायालयात प्रलंबित प्रकरणात त्यांची बाजू मांडण्याकरिता मोफत विधी सेवा देण्यात येते. तसेच विधी सेवा प्राधिकरणामार्फत पुरविण्यात येणाऱ्या इतर सर्व सेवांबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुहास भोसले यांनी मार्गदर्शन केले.
            नगर परिषद भंडाराचे आधार शहर उपजीविका केंद्राचे नोडल अधिकारी प्रविण पडोळे म्हणाले, बचत गटाच्या माध्यमातून सर्व दिव्यांगांनी एकत्र येवून शासनासमोर आपल्या समस्या मांडाव्या तसेच शासनामार्फत त्यांच्या करिता मिळणाऱ्या सर्व शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे त्यांनी सांगितले. नगर परिषद दिव्यांग कल्याण योजनेचे नोडल अधिकारी श्री. इंगोले यांनी नगर परिषद भंडारा यांच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या दिव्यांग कल्याण योजनांबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुहास भोसले यांच्या हस्ते दिव्यांग कल्याण योजनेअंतर्गत दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.