पांजरा येथील आई महिला बचत गटाला जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांची भेट

भूमिहीन महिलेला बचत गटाची साथ पांजरा येथील आई महिला बचत गटाने उभारला कुक्कुटपालन व्यवसाय

· जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांची भेट

 

भंडारा, दि. 14: महिला आर्थिक विकास महामंडळ, भंडारा अंतर्गत स्थापित शक्ती लोकसंचालित साधन केंद्र, तुमसरच्या पांजरा या गावातील आई महिला बचत गटाने कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करून आतापर्यंत 3 लाख रुपये उत्पन्न मिळविले आहे. या गटाने बँकेकडून कर्ज घेऊन वंदना धर्मराज आगासे या गटातीलच भूमिहीन महिलेला व्यवसाय उभारणीसाठी प्रोत्साहन दिले. नुकतेच जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी या कुक्कुटपालन व्यवसायाला भेट देऊन महिलांचे अभिनंदन केले.

 

वंदना धर्मराज आगासे यांच्याकडे कोविड काळाच्या आधी डीजेचा व्यवसाय होता. परंतु कोविडमुळे सर्वत्र ठप्प झाल्यामुळे त्यांना बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागला. यातच त्यांनी त्यांच्याकडे असलेले डीजेचे संपूर्ण साहित्य विकून स्वतःच्या घरी छतावर छोटेसे कुक्कुटपालन व्यवसाय सुरु केले. यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळू लागल्याने त्यांनी फेब्रुवारी- 2023 मध्ये गावातच 10 आर जागा विकत घेऊन त्याठिकाणी शेडचे बांधकाम करून कुक्कुटपालन व्यवसाय उभा केला. याच व्यवसायाला नुकतेच जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी भेट देऊन शेडचे उद्घाटन करून महिलांना प्रोत्साहन दिले आहे. या दरम्यान जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, उपविभागीय अधिकारी वैष्णवी बी, तहसीलदार टेळे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदिप काठोळे उपस्थित होते.