चर्मकार समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना

चर्मकार समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक

विकासासाठी राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना

Ø नागरिकांना योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

 

चंद्रपूर,दि. 08 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी चर्मकार समाजाच्या (चांभार, मोची, डोर, होलार इ.) व्यक्तींचे जीवनमान उंचावणे व समाजप्रवाहात मानाचे स्थान मिळविण्याच्या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या विविध शासकीय योजना चालू आर्थिक वर्षात योजना राबविल्या जात आहेत.

 

या योजनांमार्फत सामाजिक स्तर उंचाविण्यासाठी जास्तीत जास्त अर्जदारांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

 

अनुदान व बीज भांडवल योजना : या कार्यालयास वरील विविध शासकीय योजनांचे भौतिक व आर्थिक उदिदष्ट साध्य करण्यासाठी या कार्यालयामार्फत येणाऱ्या कार्यप्रणालीस गतवर्षीप्रमाणे याही वर्षी मान्यता मिळण्यासाठी अटी व शर्तीनुसार कार्यालयात अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. विशेष घटक व बीज भांडवल योजनेअंतर्गतचे यापूर्वीचे जूने कर्ज प्रस्ताव रदद करण्यात येतील. कर्ज मागणी घटक व बीज स्वहस्ताक्षरात व टंकलिखीत अथवा महामंडळाच्या विहित नमुन्यातील झेरॉक्स प्रतीत अर्ज स्वीकारण्यात येतील. महामंडळ राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आलेली आहे.

 

महामंडळ राबवित असलेल्या कुठल्याही शासकीय योजनेचा पती अथवा पत्नी यांनी लाभ घेतलेला असल्यास किंवा अर्जदार हा कुठलाही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार असल्यास कर्ज प्रस्ताव अपात्र/ रद्द करण्यात येईल. अर्जदाराने नमूद कागदपत्रासह जिल्हा कार्यालयात व्यक्तिशः अर्ज दाखल करणे अनिवार्य असून कर्ज प्रस्ताव मध्यस्थामार्फत स्वीकारले जाणार नाही. परिपूर्ण कागदपत्र असलेलेच कर्ज प्रस्ताव स्वीकारले जातील. याची नोंद घ्यावी.

 

कर्ज प्रस्तावासाठी दाखल करावयाची कागदपत्रे : जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला (चालू वर्षांचा ), रेशन कार्ड झेरॉक्स / रहिवाशी दाखला, मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, कोटेशन ( जी.एस.टी सह ), आवश्यकतेनुसार प्रकल्प अहवाल, वाहनाकरीता लायसन्स/ परतावा बॅच बिल्ला, जागेचा पुरावा, लाईटबिले / टॅक्सपावती, व्यवसायाचे नाहरकत प्रमाणपत्र आदी.

 

केंद्र शासनाची एन.एस.एफ.डी.सी. योजना : जुन्या प्रलंबित कर्जप्रस्तावाबाबत महत्वाची सूचना – ज्या लाभार्थ्यांनी यापूर्वी एन.एस.एफ.डी.सी. कर्ज योजनेअंतर्गत कर्ज प्रस्ताव जिल्हा कार्यालयात दाखल केलेले असून ज्याची लाभार्थी निवड समिती झालेली आहे व जे परीपूर्ण कर्ज प्रस्ताव जिल्हा कार्यालयाकडून प्रधान कार्यालयास मंजुरीसाठी शिफारस करण्यात आलेली आहेत. अशा लाभार्थ्यांची यादी महामंडळाच्या नोटीस बोर्डवर लावलेली आहे. संबंधित अर्जदारांनी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात संपर्क करून दिलेली कागदपत्रे तात्काळ दाखल करावी.

 

अधिक माहितीसाठी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, रयतवारी रोड, शासकीय दूध डेअरी जवळ, चंद्रपूर येथे संपर्क साधावा.