युरिक ॲसिडमुळे होणार्‍या ‘गाऊट’वर मिळवा नियंत्रण – डॉ. समीर सारडा

युरिक ॲसिडमुळे होणार्‍या ‘गाऊट’वर मिळवा नियंत्रण – डॉ. समीर सारडा

 

रक्तात युरिक ॲसिडचे प्रमाण वाढल्याने होणारा ‘गाऊट’ हा वातरोगाचा एक प्रकार आहे. या विकारासंबंधी प्रसिद्ध वातरोगतज्ज्ञ डॉ. समीर सारडा यांनी मार्गदर्शन केले आहे.

गाऊट विकार काय असतो?

युरिक ॲसिड या उत्सर्जित घटकाचे रक्तातील प्रमाण दीर्घकाळ वाढले असेल, तर हळू हळू ते सांध्यांमध्ये क्रिस्टल स्वरुपात जमा होते. कालांतराने हे क्रिस्टल तुटून सांध्यांच्या ऑईलमध्ये जमतात आणि त्यावर रोगप्रतिकारशक्ती हल्ला चढवते. अशा वेळी सांध्यांवर प्रचंड वेदनेसह सुज येते, यास गाऊट विकार असे म्हणतात.

रक्तातील युरिक ॲसिड का वाढते?

जन्मतः किंवा अनुवांशिक कारणांनी किडनीचे कार्यान्वयन गडबडले, अतिलठ्ठपणा, अत्याधिक रेड मीटचे सेवन, साखरेचे प्रमाण अधिक असलेले पेय जसे कोल्ड्रिक़्स्म्, हाय फॅटी फूड यांमुळे रक्तातील युरिक ॲसिडचे प्रमाण वाढू शकते. शिवाय मधूमेह, किडनीचे विकार, डाययुरेटिकचे सेवन अशा कारणांमुळेही युरिक ॲसिडची जोखिम वाढते.

लक्षणे काय व रोगनिदान कसे करतात?

लक्षणांमध्ये अंगठ्याच्या सांध्यावर अचानक सुज येते, प्रचंड वेदना होतात, पाय जमिनीवर ठेवणे कठीण होते. पुन्हा-पुन्हा अशाप्रकारचे अटॅक येतात व पुढे याची वारंवारता वाढते व हाता-पायाच्या अन्य सांध्यांवरही प्रभाव पडतो. उपचार घेतले नाही तर त्वचेखाली, कानापाशी अशा सॉफ्ट टिश्युज्‌ मध्ये युरिक ॲसिड जमा होऊ लागते. अशी लक्षणे दिसली तर डॉक्टर रक्तचाचण्या सुचवितात. मात्र गाऊटच्या ठाम निदानासाठी सांध्यातील पाण्याची तपासणी करून त्यात युरिक ॲसिडचा क्रिस्टल आहे का, हे तपासल्या जाते. याशिवाय एक्स-रे, सोनोग्राफी, सिटीस्कॅनचा सल्ला देखील दिल्या जातो.

गाऊटवर उपचार काय आहेत?

उपचाराच्या दोन दिशा आहेत. पहिलं म्हणजे अटॅक आल्यावर होणार्‍या वेदनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी व सुज कमी करण्यासाठी औषधे देतात आणि आईस पॅक चोळण्याचा सल्ला दिला जातो. पण रक्तातील वाढलेले युरिक ॲसिडचे प्रमाण नियंत्रणात आणून वारंवार येणारे गाऊट अटॅक कमी करण्यासाठी लाँगटर्म युरिक ॲसिड लोवरिंग थेरपी करावी लागते. त्यासाठी काही औषधे संधिवातज्ज्ञांच्या सल्ल्याने दीर्घकाळ घ्यावी लागतात. गाऊट विकाराची लक्षणे ओळखून वेळेत संधिवाततज्ज्ञांचा सल्ला घेतला तर विकारावर नियंत्रण शक्य आहे.