“चला जाणुया नदीला” अभियानाअंतर्गत होणार नदी संवाद

“चला जाणुया नदीला” अभियानाअंतर्गत होणार नदी संवाद

 

जिल्ह्यातील चुलबंद व वैनगंगा नदीचा समावेश

 

भंडारा, दि. 3 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत “चला जाणूया नदीला” अभियानाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी उपवनसंरक्षक तथा सदस्य सचिव “चला जाणूया नदीला” अभियान श्री. राहुल गवई यांनी या अभियानाच्या प्रगतीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी दिली. लवकरच जिल्ह्यात नदी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निर्देश त्यांनी वन विभागाला दिले.

 

“चला जाणुया नदीला” अभियानामध्ये शासनाच्या एकुण 27 विभागांचा सहभाग असणार आहे. या अभियानाची व्यापक प्रसिद्धीसाठी शाळांमध्ये सुद्धा जनजागृती करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. अभियानाच्या अनुषंगाने गावाच्या नागरी क्षेत्राची माहिती, टंचाईग्रस्त गावांची यादी, पुरप्रवण व वनक्षेत्रात असलेली गावांची यादी, पाझर तलाव साठवण तलावांची यादी, जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय, बीएमसी स्थापित झालेली ग्रामपंचायतींची यादी, नद्यांचे नकाशे, जिल्हातील पर्यटन व धार्मिक स्थळांची, मल व जल निस्सारणाची माहिती, खाऱ्या व गोड्या पाण्याची माहिती, नद्यांची व प्रदूषणांची माहिती संकलीत करण्यात येणार आहे.

 

“चला जाणुया नदीला” या उपक्रमामध्ये नदी संवाद अभियानाचे आयोजन, जनसामान्यांना नदी साक्षर करण्यासाठी उपाययोजना, नागरीकांच्या सहकार्याने नदींचा सर्वकर्ष अभ्यास, अमृत वाहीनी बनविण्यासाठी मसूदा तयार करणे, नदीचे स्वास्थ आणि मानवी आरोग्य याबाबत प्रचार प्रसार, नदी खोऱ्यांचे नकाशे, नदीची पूर रेषा, पाणलोट क्षेत्राचे नकाशे, मातीचे क्षरण, पर्जन्याच्या नोंदी, मागील पाच वर्षातील पूर आणि दुष्काळाच्या नोंदी माहिती संकलित करणे, पावसाचे पाणी योग्य जागी अडवून भूजल स्तर उंचावणे, नदी संवाद यात्रेचे आयोजन, अतिक्रमण, शोषण आणि प्रदूषण या तीन प्रमुख कारणांचा अभ्यास व त्याचा परिणाम अभ्यासणे, नदी संवाद यात्रा आयोजित करून आराखडा तयार करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.