शेती हाच सर्वाधिक उत्पन्न देणारा व्यवसाय  -जिल्हाधिकारी संदीप कदम कृषी विभाग व माविमची संयुक्त कार्यशाळा संपन्न

शेती हाच सर्वाधिक उत्पन्न देणारा व्यवसाय  -जिल्हाधिकारी संदीप कदम

  • कृषी विभाग व माविमची संयुक्त कार्यशाळा संपन्न

भंडारा, दि. 6  : पारंपरिक शेतीमध्ये पीक बदल करून अधिक उत्पन्न घेता येतो. शेतीतूनच मोठमोठे उद्योजक झाले आहेत. कधी तरी आपल्याला शेतीकडे वळावेच लागणार आहे. शेतीच शेतकऱ्यांच्या दारिद्र्याला दूर करू शकते. शेती हाच सर्वाधिक उत्पन्न देणारा व्यवसाय आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले.

कृषी विभाग भंडारा व महिला आर्थिक विकास महामंडळ, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी सहाय्यीत नवतेजस्वीनी ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत महिला बचत गटातील शेतकरी कुटुंबाकरिता कृषिवर आधारित व्यवसाय वृद्धी कार्यशाळा 6 जून 2022 रोजी जिल्हा नियोजन समिती कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी शेतकरी कुटुंबांना मार्गदर्शन करताना अध्यक्षस्थानावरून जिल्हाधिकारी संदीप कदम बोलत होते. यावेळी मंचावर विभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी संदीप कदम पुढे म्हणाले, शेती व शेतीला पुरक असे व्यवसाय आज शेतकऱ्यांच्या विकासासाठी महत्वाचे आहेत. नरेगाच्या माध्यमातून जनावरांसाठी गोठे बांधून दिले जातात. अनेक योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी शेतीचे योग्य व्यवस्थापन व नियोजन केल्यास शेतीच शेतकऱ्यांची तारणहार आहे, असे मत व्यक्त केले.

विभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड यांनी उपस्थित शेतकरी कुटुंब व विद्यार्थी यांना मार्गदर्शन करताना आधुनिक व शेंद्रीय शेती करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करावेत, असे मत व्यक्त केले.

प्रास्ताविक माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे यांनी केले. जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी उपस्थित विद्यार्थी व शेतकरी दाम्पत्याशी चर्चा केली. यावेळी लोकसंचालित साधन केंद्राच्या व्यवस्थापक, सहयोगिनी, बचत गटातील महिला यांच्यासह विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.