गोवर रोगासंबंधी काळजी घेणे आवश्यक  एम आर लसीचे २ डोज देणे हाच उपाय

गोवर रोगासंबंधी काळजी घेणे आवश्यक 

एम आर लसीचे २ डोज देणे हाच उपाय

 

चंद्रपूर २८ नोव्हेंबर – गोवर हा मुख्यत: लहान मुलांमध्ये आढळणारा सांसर्गिक (विषाणू) आजार आहे. यात आधी सर्दी, खोकला, ताप आणि मग अंगावर पुरळ उठतात. निरोगी आणि धडधाकट मुलांना याचा विशेष त्रास होत नाही. मुलांच्या महत्त्वाच्या ६ सांसर्गिक आजारांत गोवराचा समावेश केलेला आहे. (हे 6 आजार म्हणजे घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, क्षयरोग, पोलिओ आणि गोवर.) या आजाराने मृत्युही होत असल्याने गोवर रोगासंबंधी काळजी घेणे आवश्यक आहे.

गोवरचे विषाणू श्वसनावाटे प्रवेश करतात. सगळयात जास्त दुष्परिणाम श्वासनलिकांच्या आतल्या भागात होतात. म्हणूनच गोवरामध्ये खोकला येतो. शरीरात एकदा विषाणुप्रवेश झाला की ८ ते १२ दिवसांनी लक्षणे दिसतात. यात डोळे लाल होणे, ताप व चेहऱ्यावर किंवा सर्वांगावर पुरळ येणे व खोकला, सर्दी ( यापैकी एक, दोन किंवा सर्व लक्षणे ). गोवर रोगात येणारे पुरळ हे फोड आल्यासारखे दिसत नसुन लालसर असतात आणि त्यात पू होत नाही.

प्रामुख्याने पाच वर्षाखालील बालकांमध्ये हा आजार आढळत असल्याने कुटुंबियांनी गोवरच्या लक्षणांवर लक्ष ठेवावं. गोवर हा वेगाने पसरणारा आजार असल्याने लहान मुलांमध्ये गोवरची लक्षणं दिसल्यास तातडीने वैद्यकीय उपचार सुरू करावे. देशात दरवर्षी हजारो बालके गोवर आजारामुळे मुत्यूमुखी पडतात. आपल्या बालकांमधील प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी लसीकरण आवश्यक असून युवा पिढी सुदृढ व्हावी यासाठी पालकांनी आपल्या मुलांना लस देण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे

 

गोवरचे दुष्परिणाम : गोवरानंतर जिवाणूसंसर्गाचे आजार होण्याची प्रवृत्ती होते. त्यामुळे न्यूमोनिया, कान दुखणे, सुजणे, फुटणे, क्षयरोग उफाळून येणे, इत्यादी त्रास होतो. गोवर झालेल्या रुग्णास अतिसार व न्युमोनिया हे गुंतागुंतीचे आजार होण्याची शक्यता दाट असते. गोवर रुग्णांमध्ये होणाऱ्या मृत्यूचे न्युमोनिया हे एक प्रमुख कारण आहे. ‘ अ ‘ जीवनसत्व कमी गौण रुग्णाच्या बुबुळावर पांढरा पडदा येऊन अंधत्व येऊ शकते. कानातुन पाणी वाहण्याचा विकार सुद्धा होऊ शकतो तसेच मेंदुज्वर हा गंभीर आजार होण्याची सुद्धा शक्यता असते.

 

गोवरवर उपचार : गोवर रोगावर ठराविक असा उपचार नाही, एम आर लसीचे २ डोज देणे हा गोवर सिंड्रोम टाळण्याचा एकमेव उपाय आहे.

 

गोवर लसीचे दोन डोज :

शासनाच्या नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत एम आर लसीचे २ डोज दिले जातात

पहिला डोज ९ महिने पूर्ण ते १२ महिने पूर्ण होईपर्यंतच्या वयोगटात

दुसरा डोज १६ महिने पूर्ण ते २४ महिने पूर्ण होईपर्यंतच्या वयोगटात

 

गोवर झाल्यास कुठे संपर्क करावा : गोवर आजाराची लक्षणे दिसताच तात्काळ नजीकच्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क साधावा.