बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

        भंडारा, दि.22 : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत बाल शक्ती व बाल कल्याण पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट असून www.awards.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

       बाल शक्ती पुरस्कारासाठी ज्या मुलांनी (5ते 18 वर्षे) शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नावीन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नावीन्यपूर्ण कामगिरी केलेली आहे त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.

        बाल कल्याण पुरस्कार दोन भागात देण्यात येणार आहे. वैयक्तिक स्तरावर मुलांच्या विकास संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी व उदात्त भावनेतून किमान सात वर्ष काम करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच संस्था स्तरावर बाल कल्याण क्षेत्रात किमान 10 वर्ष सातत्यपुर्ण आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व पुर्णत: शासनाच्या निधीवर अवलंबून नसणाऱ्या संस्थेला हा पुरस्कार दिला जाणार आहे.