क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशाकरिता विभागीय चाचण्याचे आयोजन…

क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशाकरिता विभागीय चाचण्याचे आयोजन…

गडचिरोली, दि.05: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत आंतरराष्ट्रीय व ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी महाराष्ट्रातुन प्रतिभावान खेळाडुंची निवड करुन त्यांना क्रीडा मार्गदर्शकांद्वारे शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलित आहार व आवश्यक क्रीडा सुविधा पुरवुन त्यासाठी सुसंघटीत प्रयत्न करण्याच्या दृष्टीने व क्रीडा संस्कृती रुजविण्याच्या हेतुने शासनाची सदर योजना नागपुर विभागात राबविण्यात येत आहे.

यामध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक मुलामुलींची क्रीडा नैपुण्य चाचणी दि. 13/09/2022 पासुन विभागीय क्रीडा संकुल, कोराडी रोड, मानकापुर, नागपुर येथे घेण्यात येणार आहे. या मध्ये 8 ते 14 वयोगटातील मुलामुलींकरिता 30 मी. धावणे, 800 मीटर धावणे, उभे राहुन लांब उडी, उभे राहुन उंच उडी, मेडीसीन बॉल थ्रो, उंची वजन इत्यादी चाचण्यांचा समावेश आहे. 14 वर्षे पेक्षा जास्त असणारे खेळाडूंकरीता राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम 6 क्रमांकाच्या खेळाडूंची कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहे.क्रीडा प्रबोधिनी येथे प्रवेश घेणाऱ्या इच्छूक खेळाडूंनी जन्मतारखेच्या पुराव्यासह दि. 13/09/2022 रोजी विभागीय क्रीडा संकुल कोराडी येथे सकाळी 09.00 वाजता उपस्थित राहावे. सदर चाचणीकरीता खेळाडूंनी भोजन व निवासव्यवस्था स्वत: करावी. सदर विभागीय चाचणी व राज्यस्तर निवड चाचणीतून खेळाडूंची अंतिम निवड झाल्यास निवास, भोजन, शिक्षण, खेळ गणवेश या बाबतचा संपुर्ण खर्च शासनामार्फत केला जाणार आहे.

अधिक माहिती करीता क्रीडा मार्गदर्शक,एस.बी.बडकेलवार,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,गडचिरोली यांचेशी संपर्क साधावा असे प्रशांत दोंदल,जिल्हा क्रीडा अधिकारी,गडचिरोली तथा प्राचार्य क्रीडा प्रबोधिनी,गडचिरोली यांनी कळविले आहे.