भंडारा : कृषी यांत्रिकीकरण योजनेत सहभाग नोंदविण्यासाठी नवा जीआर वापरा

कृषी यांत्रिकीकरण योजनेत सहभाग

नोंदविण्यासाठी नवा जीआर वापरा

            भंडारा,दि.22 : शेतीमध्ये आवश्यक असणाऱ्या यंत्र व अवजार निर्मितीत नवनवीन प्रयोग होत आहे. मात्र याला शासन मान्यता नसते. अशा उल्लेखनीय प्रयोगाला मान्यता मिळविण्याची कार्यपद्धत असणारा शासन निर्णय (जीआर ) राज्य शासनाने जारी केला असून त्याचा कृषी अभियांत्रिकी क्षेत्रात काम करणाऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने केले आहे.

            राज्यातील कृषी विद्यापीठामार्फत विविध स्वरूपाची नाविन्यपूर्ण यंत्र व अवजारे विकसित करण्यात येतात. तथापि, त्यांचे मोठ्या प्रमाणात व्यावसायिक उत्पादन करण्यासंदर्भात विद्यापीठाच्या मर्यादा असल्याने त्याचा लाभ शेतकऱ्यांना देता येत नाही. त्याचप्रमाणे खाजगी उत्पादकांकडून ही नाविन्यपूर्ण यंत्र व औजारे विकसित केली जातात. परंतु, त्यांचा अनुदानावर पुरवठा करण्याच्या योजनेत समावेश नसल्याने अनुदानावर शेतकऱ्यांना ते उपलब्ध होत नाहीत.

या बाबी विचारात घेऊन विद्यापीठाने विकसित केलेल्या औजारांसाठी खाजगी उत्पादकांची नियुक्ती करणे, तसेच खाजगी उत्पादकांनी विकसित केलेले यंत्र औजारांचा राज्य पुरस्कृत कृषी अभियांत्रिकी योजनेत समावेश करण्याबाबत विस्तृत कार्यपद्धती 11 मे 2011 च्या शासन निर्णयान्वये घोषित करण्यात आली आहे. सदर शासन निर्णय डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन (www.maharashtra.gov.in) या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आलेला आहे. तरी नाविन्यपूर्ण कृषी औजाराचा लाभ शेतकऱ्यांना मिळण्याच्या हेतूने जास्तीत जास्त कृषी अवजारे उत्पादकांनी दिनांक 11 मे 2019 च्या शासन निर्णयाद्वारे विहित कार्य पद्धती नुसार आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी हिंदूराव चव्हान यांनी केले आहे.