नैसर्गिक आपत्तीमुळे विमा संरक्षित पिकाचे नुकसान झाल्यास विमा कंपनीला पूर्वसूचना देण्याचे आवाहन

नैसर्गिक आपत्तीमुळे विमा संरक्षित पिकाचे नुकसान झाल्यास

विमा कंपनीला पूर्वसूचना देण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 21 सप्टेंबर : प्रधानमंत्री पिक विमा योजना व स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भूस्खलन, गारपीट, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे अधिसूचित पिकांचे नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येते. स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकांतर्गत विमा संरक्षित क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढून, ओसंडून वाहणारी विहीर किंवा पुराचे पाणी शेतात शिरून शेत दीर्घकाळ जलमय राहिल्यामुळे पिकाचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले, तर त्या बाबींमध्ये सदर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत आपल्या विमा संरक्षित पिकाचे नुकसान झालेल्या बाबतची पूर्वसूचना आपल्या संबंधित विमा कंपनीला द्यावी.
याकरीता शेतकऱ्यांनी क्रॉप इन्शुरन्स ॲप, विमा कंपनी टोल फ्री क्रमांक, विमा कंपनीचा ई-मेल, विमा कंपनीचे तालुकास्तरीय कार्यालय, कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी कार्यालय तसेच ज्या बँकेत विमा जमा केला ती बँक शाखा या पर्यायाचा वापर करावा. नुकसानीबाबतची पूर्वसूचना दिल्यानंतर वैयक्तिक स्तरावर नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे, असे कृषी आयुक्तालयाचे कृषी संचालक विकास पाटील यांनी कळविले आहे.