जिल्हयातील शेतकऱ्यांनी करडई पिकाची लागवड करावी – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

जिल्हयातील शेतकऱ्यांनी करडई पिकाची लागवड करावी – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

Ø जिल्ह्यात 5 हजार एकर क्षेत्रावर करडई पिकाची लागवड व विक्रीचे नियोजन

चंद्रपूर दि. 21 सप्टेंबर : चंद्रपूर जिल्ह्यात तेलबिया उत्पादन प्रक्रिया व विक्री प्रकल्पांतर्गत, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि चंद्रपूर जिल्हा कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने रब्बी हंगामात करडई पिकाचे 5 हजार एकर पर्यंत लागवड व विक्रीचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती- भटक्या जमाती (ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी) या प्रवर्गातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
शेतकऱ्यांना करडई लागवड प्रोत्साहन म्हणून प्रती एकर 2200 रुपये निविष्ठेकरीता मिळणार आहेत. यामध्ये आपल्या गावातील गट, कंपनी व वैयक्तिक शेतकऱ्यांनी क्लस्टर तयार करून लागवड करणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांनी https://mahajyoti.org.in/en/notice-board/ या लिंकवर बियाण्यांकरीता नोंदणी करावी. जिल्ह्यामध्ये करडई तेलाची चांगली मागणी असून आरोग्यासाठी करडई तेलाचे वेगळे महत्त्व आहे. करडई पिकाचे वन्य प्राण्यांपासून नुकसान होत नाही, तसेच या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव कमी असतो. जिल्ह्यात भात तसेच सोयाबीन पिकाची काढणी झाल्यानंतर कमीतकमी पाण्यावर येणारे हे पीक असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी करडई पिकाची लागवड करावी.
अर्जदार शेतकऱ्यांनी किमान 1 एकर क्षेत्रावर पेरणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही. त्यासोबतच करडई पिकाची खरेदी करण्याची हमी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेअंतर्गत राहील.
अधिक माहितीकरीता शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, आत्मा विभागाचे एटीएम व बिटीएम यांच्याकडे प्रत्यक्ष माहिती जाणून घ्यावी  किंवा महाज्योतीचे समन्वयक श्री. पचारे 9579851794 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बराटे यांनी कळविले आहे.