अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या वाहनांवर जिल्हा भरारी पथकाची कारवाई Ø 1 लक्ष 21 हजार 800 रुपयाचा दंड वसूल

अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या वाहनांवर

जिल्हा भरारी पथकाची कारवाई

Ø 1 लक्ष 21 हजार 800 रुपयाचा दंड वसूल

चंद्रपूर दि. 18 ऑगस्ट : जिल्हा भरारी पथकाने दि. 14 व 16 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 8.40 च्या सुमारास गुरुद्वारा परिसर येथे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या चार वाहनांवर दंडात्मक कार्यवाही करत 1 लक्ष 21 हजार 800 रुपयाचा दंड वसूल केला.

चंद्रपूर येथील मिथिलेश चन्ने, यांच्या मालकीचे हॉपटन वाहन क्र. एमएच 34, एम-4363, बायपास रोड येथील भोला चव्हाण यांच्या मालकीचे वाहन क्रमांक एमएच 34,ए-7116, अमोल वाघ यांच्या मालकीचे वाहन क्र. एमएच 34, एपी-2046 तसेच प्रदीप सपाटे यांच्या मालकीचे वाहन क्र. एम एच 34,एबी 9336 सदर क्रमांकाची वाहने भरारी पथकाने पाहणी केली असता अवैधरित्या वाहतूक करत असल्याचे आढळून आले. सदर चारही वाहने जप्त करण्यात आली असून त्यांच्यावर दंड आकारण्यात आला आहे.

तसेच डब्ल्यूसीएल, दुर्गापूर येथील खुली कोळसा खदान मधून हिंदुस्तान लालपेठ कॉलनीमध्ये कोळसा या प्रमुख गौण खनिजाची वाहतूक करतांना राष्ट्रीय हरीत लवाद यांच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे शेरावाली कोल कॅरियर यांच्या मालकीचे दोन ट्रक क्र. एम एच 34, बीजी 6358, एमएच 34 एबी 3726 ही वाहने जप्त करण्यात आली असून जप्त वाहनांवर नियमान्वये कार्यवाही करण्यात येत आहे, असे अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी कळविले आहे.