कुष्ठरोग मुक्त झालेल्या व्यक्तींना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करावे- सीईओ विवेक जॉन्सन

कुष्ठरोग मुक्त झालेल्या व्यक्तींना व्यावसायिक प्रशिक्षण

देऊन स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करावे- सीईओ विवेक जॉन्सन

Ø कुष्ठरोगमुक्तांना साहित्य वाटप कार्यक्रम

चंद्रपूर,दि. 06 : कुष्ठरोग मुक्त झालेल्या व्यक्तींना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले. आनंदवन येथे जिल्हा परिषद शेषनिधी व सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) चंद्रपूरच्या संयुक्त विद्यमाने विकृती ग्रेड-1 व 2 च्या रुग्णांकरीता व्यावसायिक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

 

कुष्ठरुग्णांना समाजात उच्च स्थान मिळवून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याकरीता जिल्हा परिषद, चंद्रपूरमार्फत व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यानंतरही दरवर्षी कुष्ठरोगमुक्तांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना समाजात मान, प्रतिष्ठा व आर्थिक स्तर उंचावण्यास मदत करण्यात येईल.

 

त्याअनुषंगाने, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते शिबिर व निरोप समारंभ कार्यक्रमात प्रशिक्षणार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, महारोगी सेवा समिती अंतर्गत व्यवस्थापक पल्लवी आमटे, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. संदीप गेडाम, सितारतन हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.विजय पोळ, आदी मान्यवर उपस्थित होते.

 

जिल्ह्यात ग्रेड-2 चे 146 रुग्ण असून सदर रुग्णांना तालुकास्तरावर असलेल्या कुष्ठरोग संदर्भ सेवा केंद्रात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून नियमित भौतिकोपचारामुळे त्यांच्यात सुधारणा होत आहे. त्यातील चार रुग्ण व पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया झालेले सात रुग्ण असे एकूण 11 रुग्ण आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कुष्ठमुक्तांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येत असून त्यात वेल्डिंग, झेरॉक्स मशीन, इलेक्ट्रिक मेंटेनन्स, शिलाई मशीन आदी ट्रेडचा सदर प्रशिक्षणात समावेश आहे. या व्यावसायिक प्रशिक्षणामुळे सदर कुष्ठरुग्णांचे पुनर्वसन होण्यास व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यास मदत होणार आहे.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ.संदीप गेडाम यांनी तर आभार वैद्यकीय पर्यवेक्षक राजेश त्रिपुरवार यांनी मानले.