भंडारा : साथीच्या आजारांची लागण होऊ नये म्हणून खबरदारी घेणे आवश्यक – जिल्हा आरोग्य अधिकारी

साथीच्या आजारांची लागण होऊ नये म्हणून खबरदारी घेणे आवश्यक – जिल्हा आरोग्य अधिकारी

भंडारा,दि.12:- पावसाळ्यामध्ये जलजन्य आजारांच्या साथी प्रामुख्याने आढळतात. पावसाळ्यामध्ये पाण्याचे स्त्रोत्र विविध कारणामुळे दुषित झाल्यामुळे गॅस्ट्रो, अतिसार, कॉलरा, विषाणूजन्य काविळ, विषमज्वर इत्यादी आजाराची लागण होण्याची शक्यता असते तसेच दरवर्षी पावसाळ्यामध्ये ठिकठिकाणी पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होवून हिवताप, डेंग्यू, चिकणगुनिया, जे.ई सारख्या किटकजन्य आजारांचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात आढळतो. जलजन्य व किटकजन्य आजारांची लागण होऊ नये म्हणून नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.

पिण्याचे पाणी गाळून व दहा मिनिटे उकळून तसेच शुध्दीकरण केलेलेच पाणी पिण्यासाठी वापरावे. पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीन गोळ्या किंवा द्रावण वापरावे. जेवणापूर्वी व बाळास भरविण्यापूर्वी हात साबनाने स्वच्छ धुवावे. जुलाब झाल्यास ओ.आर.एस. पाकिटे शासकीय, निमशासकीय दवाखान्यातून मोफत घ्यावीत. तसेच ताक, डाळीचे पाणी किंवा भाताची पेज इत्यादी भरपूर प्रमाणात घ्यावेत. ताजे अन्न पदार्थांचे सेवन करावेत.

किटकजन्य आजारांची लागण होऊ नये म्हणून नागरिकांनी गावात असलेले निरुपयोगी वस्तु (निकामी टायर्स, फुटकी भांडी इत्यादी) या ठिकाणी पाणी साचू देवू नये. नागरिकांनी प्रामुख्याने घराच्या परिसरात, गुरांच्या गोठ्यात नियमित स्वच्छता करावी. शेणाचे खड्डे किंवा शेणखत गावापासून दूर राहतील याची खबरदारी घ्यावी. किटकापासून बचावासाठी मच्छरदाणीचा वापर करावा तसेच झोपतांना शरीराचा जास्तीत जास्त भाग झाकला जाईल असे कपडे वापरावेत. ताप आल्यास दुर्लक्ष करु नये व त्वरीत दवाखान्यात जावून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.