ग्राम समृद्धीसाठी मनरेगा’चा लाभ घ्या : मिशन महासंचालक नंदकुमार

ग्राम समृद्धीसाठी मनरेगाचा लाभ घ्या : मिशन महासंचालक नंदकुमार

Ø वंचित घटकाच्या उत्थानासाठी व गरिबी निर्मूलनासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचे अधिकाऱ्यांना आवाहन

चंद्रपूर, दि. 28 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत जास्ती जास्त नागरिकांनी सिंचन विहिरीचा लाभ घ्यावा, या उद्देशाने  शासनाने MAHA-EGS Horticulture / Well App हा मोबाईल ॲप्लिकेशन तयार केला आहे. मनरेगा अंतर्गत सिंचन विहीर व बागायत लागवडीचा लाभ देण्याच्या अनुषंगाने व मनरेगा योजनेची अंमलबजावणी मिशन मोडवर करून वंचित घटकाच्या उत्थानासाठी व गरिबी निर्मूलनासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचे आवाहन मनरेगाचे मिशन महासंचालक नंदकुमार यांनी अधिकाऱ्यांना केले. मनरेगा अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात आयोजित क्षमता बांधणी कार्यशाळेत ते बोलत होते.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही फक्त रोजगार देणारी नाही तर उत्पादक मत्ता निर्माण करणारी योजना आहे. मनरेगा योजनेअंतर्गत विविध प्रकारच्या वैयक्तिक व सार्वजनिक कामे अनुज्ञेय असून या कामांच्या माध्यमातून दि. 14 डिसेंबर 2022 च्या शासन निर्णयानुसार गरीब कुटुंबांना सुविधा संपन्न व ग्राम समृद्धी करण्यासाठी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून योजनेअंतर्गत जास्ती जास्त नागरिकांना योजनेचा लाभ देण्याच्या अनुषंगाने चंद्रपूर येथे विचार मंथन कार्यशाळा जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती. महात्मा गांधी नरेगा योजनेअंतर्गत केंद्राचा अधिक निधी वापरून राज्यातील गरिबी दूर करणारी ही एकमेव योजना आहे, असे प्रतिपादन , नंदकुमार यांनी यावेळी केले.

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी, सहायक कार्यक्रम अधिकारी व तांत्रिक सहायक यांनी MAHA-EGS Horticulture / Well App मध्ये नोंदविण्यात आलेले सर्व विहीरींना दि 31 डिसेंबर 2023 पर्यंत तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देऊन कार्यारंभ आदेश द्यावेत जेणेकरून या विहिरी 31 मार्च 2024 पर्यंत पूर्ण होतील या पद्धतीने काम करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांना केले. तसेच, मनरेगा अंतर्गत अधिकाऱ्यांनी किमान एक गाव दत्तक घेऊन त्या गावात मनरेगाची विविध प्रकारच्या कामातून समृद्ध करावे, असे प्रतिपादन केले.

योजनेअंतर्गत नियोजनबद्ध पध्दतीने कामे करण्यासाठी गावात जाबकार्ड व आधारकार्ड नसलेली कुटुंबे, शाळाबाह्य व कुपोषित मुले असलेली कुटुंबे, गॅस न वापरणारे कुटुंबे इ. चे सर्वेक्षण करुन त्या कुटुंबांना प्राधान्यक्रमाने मनरेगांतर्गत लाभ घ्यावे जेणेकरून बहुआयामी दरिद्री निर्देशांकानुसार (Multidimensional Poverty Index) गावातून गरीबीच्या उच्चाटनास सुरुवात होईल असे मत नंदकुमार यांनी व्यक्त केले व अधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम करून ग्रामसमृद्धी साठी काम करण्याचे सूचना उपस्थितांना दिल्या.

या प्रसंगी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विवेक जॉन्सन, उपजिल्हाधिकारी (रोहयो) अजय चारडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक, मनरेगा राज्य गुणवत्ता निरीक्षक राजेंद्र शहाडे, विक्रांत जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.