गडचिरोली : जिल्ह्यातील दुर्गम भागातील तीन नवीन पुलांच्या बांधकामांना व रस्त्यांना मंजूरी

गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील तीन नवीन पुलांच्या बांधकामांना व रस्त्यांना मंजूरी

गडचिरोली, दि.१२, जिमाका : जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केलेल्या प्रयत्नामुळे तसेच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत दुर्गम भागात तीन पुलांचे व लगतच्या रस्त्यांचे काम मंजूर झाले आहे. सडक, परिवहन व राजमार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चौडमपल्ली, दीना नदी व गुंडेनुर नाला यावर तीन पुलांच्या बांधकामांना मंजूरी दिल्याने जिल्ह्यातील आवश्यक पुल बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दुर्गम भागातील या तीन पुलामुळे तेथील लोकांचे जीवन सुसह्य होण्यास मदत होणार आहे. पावसाळयात या भागात वारंवार पुल नदीच्या पुरामुळे खाली जात होते. व त्यांचे संपर्क प्रशासनाशी राहत नव्हते. त्यामुळे तेथे पुलाची आवश्यकता ओळखून जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दुर्गम भागातील समस्या ओळखून केंद्रात पुलबांधकामाविषयी सतत पाठपुरावा करुन या तीन नदीवर पुल बनविण्याची मंजूरी करवून घेतली.
नवीन मंजूर झालेल्या कामांमध्ये गुंडेनूर नाला आलापल्ली भामरागड रोडवर ८०० मि लांबीचा पूल तयार होणार आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग यामध्ये साकोली -वडसा आरमोरी – आष्टी -आलापल्ली- सिरोंचा रोडवरील दुरुस्ती व कामांसह, दिना नदीवरील १४० मीटर लांबीचा आणि चौडमपल्ली नाल्यावरील ४५ मीटर लांबीचा पूलही मंजूर करण्यात आला आहे. या कामाबाबत सविस्तर अंदाजपत्रक ३१ ऑगस्टपर्यंत तयार करण्याचे निर्देश केंद्र शासनाकडून देण्यात आले आहेत. सदर कामे डिसेंबर अखेर निविदा स्तरावर येतील याबाबत नियोजन करण्यात येणार आहे.