लसीकरण मोहिमेंतर्गत 8 ते 14 ऑक्टोबर दरम्यान ‘मिशन कवचकुंडल’ अभियान                                       Ø जिल्ह्यात रोज 220 केंद्राद्वारे होणार लसीकरण

लसीकरण मोहिमेंतर्गत 8 ते 14 ऑक्टोबर दरम्यान

‘मिशन कवचकुंडल’ अभियान                                      

Ø जिल्ह्यात रोज 220 केंद्राद्वारे होणार लसीकरण

चंद्रपूर दि. 7 ऑक्टोबर : जिल्ह्यातील नागरिकांची कोव्हीड लसीकरणाची गती वाढविण्यासाठी व शत प्रतिशत लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे 8 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत ‘मिशन कवचकुंडल’ अभियान राबविण्यात येणार आहे.
या अंतर्गत ग्रामीण भागात प्रत्येक दिवशी 174 लसीकरण केंद्र, शहरी भागात 26 व महानगर पालिका क्षेत्रात 20 अशा एकूण 220 लसीकरण केंद्राद्वारे 44 हजार लाभार्थ्यांना कोव्हीड लस देण्यात येणार आहे. सदर मोहिमेसाठी 2 लक्ष 64 हजार लाभार्थ्यांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 11 लक्ष 83 हजार 896 नागरिकांचा पहिला डोज तर 3 लक्ष 72 हजार 881 नागरिकांचे दोन्ही डोज असे एकूण 15 लक्ष 56 हजार 777 डोज देण्यात आले आहेत.
लसीकरणाच्या अभ्यासावरून असे निदेर्शनास आले आहे की, कोव्हीड लसीकरण केलेल्या लाभार्थ्यांमुळे इतरांना संसर्ग होण्याचा धोका फारच कमी असून अतिगंभीर आजार होण्याचे प्रमाण सरासरी 95 टक्क्यांनी कमी झाले आहे. तसेच कोव्हीड आजारामुळे मृत्युच्या प्रमाणातसुध्दा सरासरी 95 टक्के धोका कमी होतो. त्यामुळे यापूर्वी लस न घेतलेल्या लाभार्थ्यांनी ‘मिशन कवचकुंडल’ योजनेचा लाभ घेऊन लसीकरण करून घ्यावे. त्याचप्रमाणे पहिला डोज घेतल्यानंतर दुस-या डोजसाठी पात्र झालेल्या लाभार्थ्यांनीसुध्दा सदर मोहिमेंतर्गत लस घेऊन सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, महानगरपालिका आयुक्त्‍ राजेश मोहिते यांनी केले आहे.