गडचिरोली : अतिसार नियंत्रण पंधरवाड्याला जिल्हयात सुरूवात लक्षणे आढळल्यास आरोग्य विभागाला त्वरित संपर्क साधा – जिल्हाधिकारी

अतिसार नियंत्रण पंधरवाड्याला जिल्हयात सुरूवात

लक्षणे आढळल्यास आरोग्य विभागाला त्वरित संपर्क साधा – जिल्हाधिकारी

गडचिरोली : पावसाळ्यात बळवणाऱ्या अतिसार संसर्गाबाबत कोणाला लक्षणे आढळल्यास त्वरित नागरिकांनी आरोग्य विभाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले. आज झालेल्या जिल्हास्तरीय सुकाणू समितीच्या बैठकीत ते बोलत होते. दरवर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर अतिसाराचा संसर्ग वाढण्याची शक्यता असते. त्यानूसार आरोग्य विभागाकडून अतिसार संसर्ग रोखण्यासाठी उपाय योजना राबविल्या जातात. त्यानूसार जिल्हयात प्रत्येक ग्रामपंचायतीअंतर्गत अतिसार नियंत्रण पंधरवाडा दि.१५ जुलै पासून ३० जुलै पर्यंत साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने गावस्तरावर आशा, ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांचे मार्फत जनजागृती केली जाणार आहे. जिल्हाधिकारी यांनी या बैठकीत अतिसार झालेल्या बालकांमध्ये ओआरएस व झिंकच्या वापराबाबतचे प्रमाण योग्य होईल याकडे लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या. पुढिल दोन महिने अतिसार नियंत्रणाबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे व पोटाच्या आजारांबाबत नागरिकांना आवश्यक माहिती पोहचवावी अशा सूचनाही त्यांनी बैठकीत उपस्थितांना दिल्या. या सूकाणू बैठकीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, उप मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक चव्हाण, अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विनोद मशाखेत्री, डॉ.समीर बनसोडे, जिल्हा माहिती अधिकारी उपस्थित होते.

अतिसार नियंत्रणासाठी येत्या काळात पाच वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या बालकांच्या घरात ओआरएम व झिंकचा वापर तसेच उपलब्धता वाढविण्यात येणार आहे. तसेच शहरी झोपडपट्टया, पूरग्रस्त भाग, दुर्गम आरोग्य उपकेंद्र, दुर्गम लोक वस्ती अशा जोखीम ग्रस्त भागामध्ये विशेष लक्ष देण्यात येणार आहे. याबाबत जिल्हयात दि.12 ते दि.14 पर्यंत सहभागी आरोग्य कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. शुद्ध पाणी पुरवठा यासाठी ग्रामसेवक व ग्रामपंचायतीचा कार्य महत्वाातचे असून आशा व आरोग्य विभागाचे संसर्ग शोधण्याचे व उपाययोजना राबविण्याचे कार्य महत्वा्यचे असल्याचे बैठकीत जिल्हाधिकारी यांनी सांगितले. तसेच ग्रामसेवक यांनी पाणी पुरवठा सुस्थितीत ठेवला नाही तर त्यांना संसर्ग रोखण्यात जबाबदारी पार पाडली नाही म्हणून जबाबदार धरण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले. पाणी पुरवठा विभागाने जिल्हयातील दुषित तसेच लाल कार्ड धारक व पिवळे कार्ड धारक स्त्रोतांची तपासणी करून योग्य उपाययोजना राबविण्याबाबतही सूचना झालेल्या बैठकीत देण्यात आल्या.

पाणी उकळून प्या व अतिसाराची लक्षणे ओळखा : पावसाळयांत सर्वांत जास्त आजार दुषित पाण्यामूळे होतात. अशुद्ध असणारे पाणी न पिता, कोणतेही पिण्याचे पाणी या दिवसात उकळून ते थंड करून प्यावे. अतिसार संसर्ग ओळखण्यासाठी संसर्ग झालेल्या व्यक्तीला जुलाब होतात. अस्वसथपणा, चिडचिड, घटाघटा पाणी पिणे व डोळे खोल जातात. अशावेळी जलशुष्कता असते. यातील काही लक्षणे आढळल्यास आरोग्य विभागाचा सल्ला घ्यावा व औषधोपचार करावेत.
जिल्हयात 22 ग्रामपंचायतींमध्ये 39 गावांमध्ये लाल कार्ड दिले होते. या गावांमध्ये ग्रामपंचायतीने उपाययोजना राबविल्या आहेत. परंतू जोखमीच्या जिलहयातील 43 पाणी पुरवठा स्त्रोतांबाबत ताबडतोब तपासणी करून पुन्हा खात्री करावी अशा सूचनाही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यावेळी दिल्या. जिल्हाधिकारी यांनी कोणताही दूषित पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत सुरू राहता कामा नये व तो पुर्ण बंद करण्याच्या सूचना दिल्या.