प्रोत्साहनपर लाभ मिळविण्याकरिता आधार कार्ड बँक खात्यास लिंक करा – जिल्हा उपनिबंधक

प्रोत्साहनपर लाभ मिळविण्याकरिता आधार कार्ड बँक खात्यास लिंक करा – जिल्हा उपनिबंधक

भंडारा, दि. 12 : महात्मा जोतीराव फुले शेतकरी सन्मान योजना अंतर्गत सन 2017-18 ते 2019-2020 या तीन आर्थीक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थीक वर्षात पिक कर्जाची उचल करून विहीत मुदतीत नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी सदर कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पिक कर्जाच्या मुद्दल रक्कमेवर जास्तीत जास्त 50 हजार रूपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

 

सदर प्रोत्साहनपर रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यामध्ये वर्ग होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचे वापरात असलेले बँक खाते आधार कार्डशी लिंक केलेले असणे आवश्यक आहे. एकूण कर्जखाते विशिष्ट क्रमांक 37621 असून 36 हजार 627 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केलेले आहे तर अद्यापही 994 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केलेले नसल्याचे दिसून येते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केलेले नाही अशा शेतकऱ्यांनी तात्काळ नजिकच्या आधार केंद्रावर आवश्यक आगदपत्र घेवून जावे व आधार प्रमाणिकरण करून घ्यावे. जेणेकरून संबंधित शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळणे शक्य होईल, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था शुध्दोधन कांबळे यांनी केले आहे.