पोंभुर्णा व गोंडपिपरी अतिवृष्टी नुकसान भरपाई : शेतकऱ्यांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करावे….

पोंभुर्णा व गोंडपिपरी अतिवृष्टी नुकसान भरपाई : शेतकऱ्यांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करावे

Ø पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

चंद्रपुर, दि. 2 : जुलै व ऑगस्‍ट 2022 या कालावधीत झालेल्‍या अतिवृष्‍टीमुळे शेतपिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. सदर शेतपिकांच्या झालेल्‍या नुकसानापोटी शासनाने हेक्‍टरी 13, 600 रू. , महत्‍तम ३ हेक्‍टरपर्यंत नुकसान भरपाई मंजूर केली आहे. या संदर्भात पोंभुर्णा व गोंडपिपरी तालुक्‍यातील लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांकडून तक्रारी प्राप्‍त झालेल्‍या आहेत. या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याचे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिका-यांना दिले आहेत.

गावातील शेतीचे नुकसानीचे पंचनामे प्रत्‍यक्ष शेतावर न जाता करण्‍यात आलेले आहेत. प्रत्‍यक्षात नुकसान झालेल्‍या शेताचे क्षेत्र कमी नोंदविण्‍यात आले असून काही नदीकाठील गावांचे सर्व्‍हेक्षण व पंचनामे करण्‍यात आले नाही. नुकसान भरपाई मंजूर झालेल्‍या शेतक-यांची यादी ग्रामपंचायत स्‍तरावर लावण्‍यात आलेली नसल्‍याने गावातील कोणत्‍या शेतक-याला किती नुकसान भरपाई मिळाली किंवा कसे हे लक्षात येत नाही. सर्व्‍हेक्षण करणारे कृषी सहायक, तलाठी व ग्रामसेवक यांनी हलगर्जीपणाने सदर सर्व्‍हेक्षण केले आहे, अशा तक्रारी शेतकऱ्यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केल्या आहेत. या तक्रारींचे तातडीने निराकरण करून शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिका-यांना दिले आहेत.