अश्वमेध महायज्ञातून दूर होईल मनाचे प्रदूषण सांस्कृतिक मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास

अश्वमेध महायज्ञातून दूर होईल मनाचे प्रदूषण सांस्कृतिक मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास

महामहीम राज्यपाल श्री. रमेश बैस यांच्या हस्ते यज्ञाचे उद्घाटन

मुंबई, दि.२२ – पाच दिवसीय अश्वमेध कुंडीय महायज्ञ वायूमंडळाला तर प्रदूषणातून मुक्त करणारच आहे, शिवाय विचारांच्या यज्ञातून मनाचे प्रदूषणही दूर होणार आहे. गायत्री परिवाराच्या माध्यमातून समाजाला मनाची शुद्धता प्रदान केली जाईल, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य तसेच मत्स्य व्यवसाय मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आज (बुधवार) व्यक्त केला. विश्व गायत्री परिवाराच्या वतीने खारघर (नवी मुंबई) येथील कॉर्पोरेट पार्क ग्राऊंडवर आयोजित अश्वमेध महायज्ञाच्या उद्घाटन सोहळ्यात ना. श्री. मुनगंटीवार बोलत होते.

या महायज्ञाचे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम श्री. रमेश बैस यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्राचे वने, सांस्कृतिक कार्यमंत्री व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती होती. विश्व गायत्री परिवाराचे गुरुवर्य डॉ. श्री. चिन्मय पंड्या, श्रद्धेय शैल दिदी, सौ.सपना मुनगंटीवार,श्रीमती शेफाली पंड्या तसेच गायत्री परिवाराच्या सदस्यांची विशेष उपस्थिती होती.

यावेळी ना. श्री. मुनगंटीवार यांनी यज्ञ परिसरात आयोजित प्रदर्शनालाही भेट दिली. महाराष्ट्राचा सांस्कृतिक कार्यमंत्री या नात्याने भगवान विठ्ठलाच्या भूमीत व छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये सर्व भाविकांचे स्वागत करताना आनंद होत असल्याची भावना ना. श्री. मुनगंटीवार यांनी सुरुवातीला व्यक्त केली. यज्ञाच्या निमित्ताने मातृशक्ती संघटित होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘हे वर्ष समस्त भारतवासीयांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. कारण या देशाचा अभिमान आणि उर्जा असलेल्या प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा अयोध्येत झाली. त्यातही मी स्वतःला सर्वाधिक भाग्यवान समजतो. कारण अयोध्येतील पवित्र मंदिरामधील गर्भगृहासह प्रत्येक ठिकाणचा दरवाजा माझ्या विधानसभा मतदारसंघातील सागवान काष्ठापासून तयार झालेला आहे. माझ्या महाराष्ट्राच्या भूमितील लाकडापासून ही दारे तयार झालेली आहेत. रामलल्लाच्या (बालकराम) मंदिरात जायचे असेल तर जगातील कोणत्याही रामभक्ताला महाराष्ट्राच्याच दारातून जावे लागणार आहे. योगायोग म्हणजे अयोध्येतील अभूतपूर्व सोहळ्यानंतर बरोबर एक महिन्याने अश्वमेध महायज्ञ मुंबईत होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड भूमीतूनच याची सुरुवात होत आहे, याचा मला मनापासून आनंद आहे.’

*‘पाषाण हृदयावर मात मिळवता येईल’*
पाषाण युगापासून आतापर्यंत मानवाने प्रत्येक टप्प्यावर प्रगती केली. पूर्वीच्या काळात तंत्रज्ञान व विज्ञान प्रगत नव्हते, पण सुख समाधान होते. आज विज्ञान व तंत्रज्ञानाने प्रगती केली आहे, मात्र प्रत्येक कुटुंबात सुख समाधानाचा अभाव आहे. आपण पाषाणयुगापासून पाषाण हृदयापर्यंतचा प्रवास केला आहे. अश्वमेध महायज्ञाच्या माध्यमातून पाषाण हृदयाच्या विकृतीवर मात करण्यास मदत होईल. पाच दिवसीय यज्ञातून काम, क्रोध, मद, मत्सर लोभ या दुर्गुणांवर नियंत्रण मिळविण्याची शक्ती मानवामध्ये निर्माण होईल. आणि युग निर्माणाच्या, महाशक्ती होण्याच्या दिशेने बुलेट ट्रेनपेक्षाही अधिक वेगाने प्रवास सुरू होईल, असा विश्वास असल्याचेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.