भंडारा : स्थानिक नागरिकांना शोध व बचाव कार्याचे प्रशिक्षण द्या – पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम

स्थानिक नागरिकांना शोध व बचाव कार्याचे प्रशिक्षण द्या – पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम

  • शोध व बचाव साहित्याचे पालकमंत्र्यांच्या लोकार्पण

भंडारा, दि.8:- आपत्ती काळात पहिला प्रतिसाद हा स्थानिक नागरिकांकडून मिळतो. स्थानिक नागरिक प्रशिक्षित असल्यास शोध व बचाव कार्य सुकर होण्यास मोठी मदत मिळते. ही बाब लक्षात घेता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने स्थानिक नागरिकांना प्रशिक्षित करावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी केल्या.

 जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण भंडाराच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या शोध व बचाव साहित्याचे पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते कारधा पूल येथे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार नाना पटोले, अभिजित वंजारी, नरेंद्र भोंडेकर, राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, उपविभागीय अधिकारी रविंद्र राठोड, तहसीलदार अक्षय पोयाम, साहेबराव राठोड व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

आपत्ती काळात नागरिकांना तातडीने मदत मिळावी यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण भंडारतर्फे 18 इंफ्लाटेबल बोट, 216 लाईफ जॅकेट, 60 लाईफ बॉय, 37 टॉर्च हे 32 लाख रुपये किंमतीचे साहित्य जिल्हा नियोजन मधून खरेदी करण्यात आले. सदर साहित्य राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूरचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नेमाने यांचे मार्फत तपासणी करून घेण्यात आले.

सदर साहित्य जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा, जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा, तहसील भंडारा, तहसील पवनी, तहसील साकोली, तहसील लाखनी, तहसील लाखांदूर, तहसील तुमसर व तहसील मोहाडी यांना वाटप करण्यात आले आहे. आपत्ती काळात या साहित्याचा वापर होणार आहे.

पालकमंत्री डॉ. कदम यांनी केली बोटिंग

बचाव व शोध साहित्याचे लोकार्पण कार्यक्रमानंतर पालकमंत्री डॉ. कदम व उपस्थित मान्यवरांनी वैनगंगा नदीत बोटिंग केली. भंडारा वॉटर स्पोर्ट्स क्लबचे राजेंद्र भांडारकर यांनी बोटिंग व क्लब विषयी माहिती दिली.