भंडारा : आजपासून जिल्हाभरात होणार रानभाजी महोत्सवास प्रारंभ

आजपासून जिल्हाभरात होणार रानभाजी महोत्सवास प्रारंभ

भंडारा,दि.8:  नैसर्गिकरित्या रानातील जंगलातील शेत शिवारात उगवलेल्या रानभाज्यांचे महत्त्व शहरातील नागरिकांना तसेच नवीन पिढीला व्हावे यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय, भंडाराच्या वतीने संपूर्ण जिल्हाभरात प्रत्येक तालुकास्तरावर रानभाजी महोत्सव 9 ते 15 ऑगस्टपर्यंत भरवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी व महिला बचत गटांनी कोविड-19 च्या नियमांचे पालन करून या रानभाजी महोत्सवाचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  हिंदुराव चव्हाण यांनी केले आहे.

 जिल्हा स्तरावरील रानभाजी महोत्सव सिव्हिल लाईन परिसरातील भंडारा तालुका कृषी कार्यालयाच्या प्रांगणात 9 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी अकरा वाजता भरणार आहे. या महोत्सवासाठी आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, जिल्हा कृषी विकास अधिकारी विश्वजीत पाडवी, उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड, भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, मोहिम अधिकारी विकास चौधरी, तंत्र अधिकारी शांतीलाल गायधने, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे, कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी तानाजी गायधने उपस्थित राहणार आहेत.

मानवी आरोग्यामध्ये सकस अन्नाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सकस अन्नामध्ये विविध भाज्यांचा समावेश असतो. रान भाज्यांमध्ये विविध प्रकारचे शरीराला आवश्यक पौष्टिक अन्नघटक, औषधी गुणधर्म असतात. रानभाज्या या नैसर्गिक असल्यामुळे त्यावर रासायनिक कीटकनाशके, बुरशीनाशके फवारणी करण्यात येत नाहीत. त्यामुळे संपूर्ण नैसर्गिक रानभाज्यांची माहिती व महत्त्व ग्रामीण तसेच शहरी भागातील जास्तीत जास्त नागरिकांना होण्यासाठी व शेतकऱ्यांसाठी विक्री व्यवस्था करून त्यातून शेतकऱ्यांना रोजगार मिळण्यासाठी 9 ऑगस्ट 2021 रोजी पासून संपूर्ण राज्यभरात कृषी विभागातर्फे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. भंडारा जिल्हा हा नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेला जिल्हा आहे. जिल्ह्यातील भंडारा, मोहाडी, तुमसर ,पवनी, साकोली, लाखणी, लाखांदूर येथे तालुकास्तरावर रानभाजी महोत्सवाचे आयोजन केले असल्याने त्या तालुक्यातील नागरिकांना आपल्या तालुका स्तरावरच रानभाजी महोत्सवाचा लाभ घेता येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी दिली.

पावसाळ्याच्या दिवसात सहजपणे उपलब्ध होणाऱ्या रान भाज्यांमध्ये शरीराला आवश्यक विविध प्रकारचे पौष्टिक अन्नघटक असतात. रानभाज्या या पूर्णपणे नैसर्गिक असून आरोग्याच्या दृष्टीने असलेले रानभाज्यांचे महत्त्व शहरी, ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी रानभाजी महोत्सवाचे आयोजन केले आहे. याचा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा. -हिंदूराव चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, भंडारा.

 

रान भाजी महोत्सवात या मिळणार भाज्या ….

कृषी विभागाच्या वतीने आयोजित 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान रानभाजी महोत्सव जिल्ह्यात सहजपणे उपलब्ध होणाऱ्या काटवल, दिंडा, टाकळ, कुडा, पातुर, अळू, शेवगा, कपालफुटी, पानांचा ओवा, खापरफुटी, बांबू, कुरडू, आघाडा, काटेमाट, चिवळ, घोळभाजी, अंबाडी, मटारु, पिंपळ, भुईआवळ, सुरण, कवट, उंबर या रानभाज्या विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत. त्यासोबतच रानभाज्या रानभाज्यांची माहिती उपयोग त्याचे संवर्धन तसेच रानभाज्यातसेच रानभाज्या बनवण्याची रेसिपी दाखवली जाणार असल्याची माहिती भंडारा तालुका कृषी अधिकारी  अविनाश कोटांगले यांनी  दिली.