स्वत:चे व देशाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी मतदान करा – जिल्हाधिकारी विनय गौडा

स्वत:चे व देशाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी मतदान करा – जिल्हाधिकारी विनय गौडा

Ø जिल्हाधिकारी कार्यालयात 13 वा राष्ट्रीय मतदार दिन

चंद्रपूर, दि.25 : अनेक हुतात्म्यांच्या बलिदानातून आपला देश स्वतंत्र झाला आहे. स्वातंत्र्यानंतर एकाच वेळी सर्वांना मतदानाचा अधिकार देणा-या भारताची लोकशाही ही जगात प्रगल्भ मानली जाते. मतदानातून आपण आपला आवाज प्रगट करू शकतो. त्यामूळे स्वत:चे आणि देशाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले.

 

उपजिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे नियोजन सभागृह येथे आयोजित 13 वा राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) पल्लवी घाटगे, प्रियंका पवार (भुसंपादन), जिल्हा खनीकर्म अधिकारी सुरेश नैताम, निवडणूक विभागाचे ब्रँड ॲम्बेसेडर सुवर्णपदक विजेते नईमुद्दीन शेख, नायब तहसीलदार लोकेश्वर गभणे उपस्थित होते.

 

‘Nothing like voting, I vote for sure’ हे यावर्षीच्या मतदार दिनाचे ब्रीद वाक्य आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, मतदानातून आपण आपला आवाज उठवू शकतो. लोकांना मतदानाचे कर्तव्य समजावून सांगणे, हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. भारताने स्वतंत्र होताच सर्वांना एकाच वेळी मतदानाचा हक्क प्रदान केला. अमेरिकेतसुध्दा असे घडले नाही. मतदारांनी आपल्या लोकप्रतिनिधीबद्दल जाणून घ्यावे आणि जबाबदारीने आपला अधिकार वापरावा, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.

 

अपर जिल्हाधिकारी श्री. देशपांडे म्हणाले, आजघडीला ज्या काही व्यवस्था कार्यरत आहे, त्यात लोकशाही ही सर्वोत्तम मानली जाते. मतदानाचा हक्क मिळण्यासाठी सर्वात पहिली अट म्हणजे, आपले नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे. प्रगल्भ लोकशाहीसाठी आपली मतदार यादी अचूक करणे, यासाठी यंत्रणा राबत असते. भारत हा तरुणांचा देश आहे. युवक बदल स्वीकारतात. त्यामुळे जास्तीत जास्त युवकांनी मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी ‘युथ व्होटिंग’ बद्दल प्रथमेश लोकेश्वर गभणे यानेसुध्दा मार्गदर्शन केले.

 

तत्पूर्वी उपजिल्हा निवडणूक कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यात धनश्री दुरुटकर आणि जान्ही डीकोंडावार (प्रथम), श्रृती आत्राम (द्वितीय) आणि खुशबु राजभर (तृतीय) यांचा समावेश होता. तसेच जिल्हाधिका-यांच्या हस्ते अर्पण खुशाल राणे आणि दर्पण खुशाल राणे या नवयुवकांना मतदार ओळखपत्र देण्यात आले.

 

या केंद्रस्तरीय मतदान अधिका-यांचा झाला सत्कार : अनंता धुरे, राजेंद्र बोरकुटे (सावली), पी. आर. सातपुते, श्रीनिवास रायला (बल्लारपूर), डी.एस. वेढे, मृणाल शिंदे (चंद्रपूर), विद्येश्वर लटपटे (राजूरा), संजय गेडाम (सिंदेवाही), किशोर शेडमाके (पोंभुर्णा), पितांबर पोहणकर यांना उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.

 

प्रास्ताविकात उपजिल्हा निवडणूक अधिकारी पल्लवी घाटगे म्हणाल्या, मतदानाइतके अमुल्य काही नाही. 2011 पासून आपण राष्ट्रीय मतदार दिन साजरा करीत आहो. नवमतदारांमध्ये जनजागृती करण्याठी वर्षभर यंत्रणा कार्यरत असते. आता वर्षातून चार वेळा नवीन मतदार नोंदणीसुध्दा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. मेश्राम यांनी उपस्थितांना मतदानाबाबत शपथ दिली.

 

कार्यक्रमाचे संचालन अजय मेकलवार यांनी तर आभार पल्लवी घाटगे यांनी मानले. कार्यक्रमाला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, एपीएस गर्ल्स हायस्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते.