व्यवसायीकांनी अन्न व खाद्यपदार्थ पॅकिंगसाठी वृत्तपत्र व छापील कागदाचा वापर टाळावा

व्यवसायीकांनी अन्न व खाद्यपदार्थ पॅकिंगसाठी

वृत्तपत्र व छापील कागदाचा वापर टाळावा

मिथुन मेश्राम सिन्देवाही – 9923155166

चंद्रपूर, दि. 5 जानेवारी : अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 चा मुळ उद्देश जनतेस सुरक्षित, सकस व निर्भेळ अन्न उपलब्ध करुण देणे हा आहे. अन्न व औषध प्रशासनामार्फत जनतेस सुरक्षित, सकस व निर्भेळ अन्न उपलब्ध करुण देण्याचे अहोरात्र प्रयत्न होत आहेत. बहुतेक अन्न व्यवसायीक पोहे, समोसे व तत्सम तळलेले अन्नपदार्थ वृत्तपत्र किंवा छापील कागदात नागरींकांना देतात. त्यामुळे जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण होतो. वृत्तपत्राची शाई ही विविध केमिकल्सपासून बनलेली असते. हे केमिकल्स कॅन्सरसारख्या आजारांना कारणीभूत असतात. त्यामुळे अशा वृत्तपत्र किंवा छापील कागदामधून तळलेले खाद्यपदार्थ व अन्नपदार्थ ग्राहकांना देणे धोकादायक ठरत आहे. त्यामुळे व्यवसायीकांनी अन्न व खाद्यपदार्थ पॅकिंगसाठी वृत्तपत्र व छापील कागदाचा वापर टाळावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त नि.दि.मोहिते यांनी केले आहे.

केंद्रीय अन्न सुरक्षा मानदे प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी वृत्तपत्र व छापील कागदांमध्ये तळलेले अन्नपदार्थ देण्यास प्रतिबंध करणारे आदेश दि. 6 डिसेंबर 2016 रोजी जारी केले आहे. त्याअनुषंगाने अन्न व औषध प्रशासनामार्फत वेळोवेळी जनजागृतीही करण्यात आली. परंतु सदर आदेशाचे यथोचित पालन अन्न व्यावसायीकांमार्फत होत नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

तरी, सर्व अन्न व्यावसायीकांनी केंद्रीय अन्न सुरक्षा मानदे प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या आदेशाचे पालन करावे . सदर आदेशाचे पालन न झाल्यास अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 नियम व नियमन 2011 अंतर्गत योग्य ती कडक कारवाई करण्यात येईल, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत करण्यात येत आहे.