बालविवाह केल्यामुळे लग्नघरातून वर व कुटुंबीय ताब्यात Ø चाईल्ड हेल्पलाईन व जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांची कारवाई

बालविवाह केल्यामुळे लग्नघरातून वर व कुटुंबीय ताब्यात

Ø चाईल्ड हेल्पलाईन व जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांची कारवाई

चंद्रपूर, दि. 9 :  मुल तालुक्यातील एका गावात बालविवाह झाला असल्याची माहिती चाईल्ड हेल्पलाईनच्या 1098 या टोल फ्री क्रमांकाद्वारे जिल्हा महिला व बालविकास कार्यालयास प्राप्त झाल्याने प्रशासनाने त्वरीत कारवाई करीत लग्नघरातून वर व कुटुंबियांना ताब्यात घेतले आहे.

30 मार्च रोजी चाईल्ड हेल्पलाईनच्या 1098 क्रमांकावर मुल तालुक्यातील एका गावात बालविवाह झाला असल्याची माहिती प्राप्त झाली होती, माहितीच्या आधारे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनात मुल पोलीस स्टेशनला सदर प्रकरणाची माहिती देण्यात आली व लगेच सदर गावाला भेट देवून वर व सर्व कुटुंबाला ताब्यात घेण्यात आले. मुल पोलीस स्टेशन येथे सदर गावातील ग्रामसेवक यांच्याद्वारे या प्रकरणात तक्रार देण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस यंत्रणा करीत आहे. या प्रकरणातील बालिकेला बाल कल्याण समिती समोर उपस्थित करण्यात येणार आहे.

            21 मार्च रोजी रोजी सदर गावात प्रशासनाद्वारे बालविवाह जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला होता. यात बालविवाह होत असल्यास 1098 या चाईल्ड हेल्पलाईनच्या टोल फ्री क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले होते. यामुळे सदर प्रकरणाची माहिती यंत्रणेला मिळाली. जिल्ह्यात बालविवाह थांबविण्यास यंत्रणा सज्ज असून कुठेही बालविवाह होत असल्यास किंवा बालविवाह झाले असल्याची माहिती मिळाल्यास चाईल्ड हेल्पलाईनच्या “1098” या टोलफ्री क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. माहिती देण्याऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असून बालविवाह घडवून आणणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

सदर कारवाई जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दिपक बानाईत, बालकल्याण समिती अध्यक्षा क्षमा बासरकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अभिषेक मोहले, हर्षा वऱ्हाटे तसेच मुल पोलीस स्टेशन येथील पोलीस पथकाने केली.